बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

दरवर्षीप्रमाणे यंदाही कांदा लागवड विस्तृत क्षेत्रावर सुरू झाली आहे. सध्या बहुतांश क्षेत्रावर कांदा पिकामध्ये पांढरी सड या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत हा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

लागवड केल्यानंतर काही दिवसांमध्येच कांद्याचे रोप मुळापासून सोडून जात असल्याची माहिती केंद्राला प्राप्त झाली. यावर त्वरित केंद्राचे पीक संरक्षण विभागाचे भरत दवंगे आणि मृदू विज्ञान विभागाचे शांताराम सोनवणे यांनी परिसरातील ममदापूर, नांदूर, राजुरी, बाभळेश्वर परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्यांच्या शेताला भेटी दिल्या.

पाहणीमध्ये कांद्यामध्ये पांढरा सड रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे श्री. दवंगे यांनी सांगितले. राहाता तालुक्यातील नांदूर येथील अनिल भाऊसाहेब भदे, अशोक भाऊसाहेब भदे, सतीश दत्तात्रय दुबाले, अशोक बाळासाहेब भदे तसेच यादव मळा येथील अमोल सोमनाथ दाभाडे या शेतकर्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी पिकाचे नमुने गोळा केले. या निदानामध्ये पांढरी सड या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कांद्याच्या या पांढर्या सड रोगावर प्रतिबंध होण्याच्यादृष्टीने वेळीच उपाययोजना होण्यासाठी श्री. दवंगे यांनी सांगितले की, कांद्याची पुनर्लागवड करण्याच्यावेळी कांद्याचे रोप हे 0.2 टक्के कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाच्या द्रावणात 10 मिनिटे बुडविल्यानंतर लागवड करावी. याशिवाय लागवडीपूर्वी जमिनीमध्ये मेटॅलिक्झील 4 टक्के + 64 टक्के डब्ल्यू डब्ल्यू पी किंवा कार्बेन्डॅझीम 12 टक्के + मेंकोक्केब 63 टक्के डब्ल्यू पी किंवा पायरॅक्लोस्टोबीन 5 टक्के + मेटीराम 55 टक्के डब्ल्यू जी यापैकी एका बुरशीनाशकांचा रासायनिक खताबरोबर प्रति एकरी एक किलो या प्रमाणात वापर करावा.

आगर यापैकी एखाद्या बुरशीनाशकांचा एक किलो प्रतिएकर 300 लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचींगव्दारे देखील वापर वापर करता येईल असे श्री.दवंगे यांनी सांगितले. त्याचबरोबर कांदा पिकामध्ये अन्नद्रव्यांचा वापर करताना प्रति एकरी 20 किलो दाणेदार गंधक वापरावे, असे शांताराम सोनवणे यांनी सुचविले. तसेच पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा एकरी 15 किलो या प्रमाणात वाढवून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास कांद्याचे पांढरी सड या रोगापासून संरक्षण होऊन मोठे नुकसान टळेल. कांदा उत्पादकांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करून आपल्या पिकाचे संरक्षण करावे, असे केंद्राच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

कांद्यामध्ये दिसून येत असलेला हा पांढरी सड नावाचा रोग असून जमिनीमधील हानीकारक बुरशीमुळे या रोगाची कांद्याच्या मुळांना सुरूवातीला लागण होते. आणि नंतर कांद्याच्या वाढणार्या कंदामध्ये ही बुरशी शिरते आणि संपूर्ण मुळे आणि कंद सडून जाऊन रोप सहजासहजी उपटून येते. या रोगाच्या सुरुवातीला कांद्याची पात पिवळसर पडून जमिनीवर पडते आणि वाळून जाते ज्या जमिनीमध्ये जास्त दिवस ओलावा टिकून राहील अशा जमिनीमध्ये ही हानीकारक बुरशी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे.