आमदनी अठन्नी अन् खर्चा रुपय्या

कांदा पिकाची अवस्था; शेतकर्‍यांचे अर्थकारण बिघडले
आमदनी अठन्नी अन् खर्चा रुपय्या

देवळाली प्रवरा |Deolali Pravara

यावर्षी उन्हाळी कांदा पिकाला विचित्र हवामानाचा जबर फटका बसला आहे. हवामान बदलामुळे कांद्याचा आकार लहान राहीला आहे. खर्च झाला जास्त अन् उत्पन्न आले कमी, अशी वाईट अवस्था कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची झाली आहे. आमदन्नी अठन्नी अन् खर्चा रुपय्या, अशा अर्थकारणामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तोडीअभावी रखडलेल्या ऊस पिकाची यंदा वाईट अवस्था झाली. यामुळे नगदी पीक म्हणून उल्लेख असलेल्या कांदा पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळाला. अनेक शेतकर्‍यांनी कांद्याचे रोप टाकून ठेवले होते. परंतु वेळेत ऊस तुटून न गेल्याने ऐनवेळी यामध्ये बदल करावा लागला. कारण उसाच्या जागेवरच कांदा लागवडीचे अनेकांचे नियोजन होते. आता रोपाचे करायचे काय? म्हणून मिळेल त्या पैशात कांद्याचे रोप विकून पैसे पदरात पाडून घेतले. यंदा ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरु राहिल्याने नोव्हेंबरपासून कांदा लागवडीला सुरुवात झाली.ज्याच्याकडे शेत रिकामे होते.

त्यांची नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लागवड झाली. परंतु ज्याचे डिसेंबरमध्ये ऊस तुटून गेले त्यांंची जानेवारीमध्ये लागवड झाली. यंदा फेब्रुवारीअखेरपर्यंत कडाक्याची थंडी राहिल्याने सुरुवातीला कांदा पिकाला हवामान चांगले होते. त्यानंतर मार्च महिना सुरु झाला आणि तापमानात वाढ सुरु झाली. एप्रिलमध्ये तर सूर्य थेट आगच ओकू लागला. अगोदर थंडी आणि त्यानंतर लगेच कडक उन्हाळा यामुळे कांदा पिकावर विपरित परिणाम झाला व कांद्याचा आकार लहान राहीला. गोलटीचे प्रमाण वाढल्याने उत्पन्नात मोठा फटका बसला. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ हवामान, तरी कधी बोचरी थंडी यामुळे करपा रोगापासून पिकाचा बचाव होण्यासाठी दर आठदिवसाला कांदा पिकाला महागडी किटकनाशकांची फवारणी करावी लागत होती.

त्यानंतर अचानकच उन्हाची तिव्रता वाढल्याने कांदा पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. आता जर कांदा काढणी केली नाही तर कांद्याची पात गळून जाईल व कांदा काढणे अवघड होऊन मोठ्या प्रमाणात कांदा जमिनीतच राहील, या भितीपोटी शेतकर्‍यांनी तीन महिन्यातच कांदा काढणी सुरु केली. कांदा काढल्यानंतर ओला कांदा सुकविण्यासाठी कांदा पाथीखाली शेतातच पंधरा दिवस झाकून ठेवण्यात आला. हा कांदा सुकल्यानंतर घरी आणून तो चाळून भुसार्‍यात भरण्यात आला.

परंतु सुकल्यानंतर त्याचा आकार आणखी कमी झाल्याने उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. त्यातच सध्या भाव अत्यंत कमी असल्याने शेतकर्‍यांनी कांदा साठवणुकीवर भर दिला आहे. खर्च जास्त अन् उत्पन्न कमी अशी वाईट अवस्था यंदा कांदा उत्पादकांची झाली आहे. यंदा बर्‍यापैकी भाव मिळाला तरच शेतकर्‍यांची पडतळ बसणार आहे. नाहीतर उसाचे तीन-तेरा झाले अन् कांद्याचा वांधा झाला. अशी स्थिती निर्माण झाली तर आकाशाला भिडलेल्या महागाईत शेतकर्‍यांचे जगणे मुश्कील होऊन जाईल.

कांदा लागवडीचा दर यावर्षी एक हजार रुपयांनी वाढला. दहा हजार रुपये एकराचा दर अकरा हजार रुपये झाला. काही ठिकाणी तर बारा हजाराच्यावर गेला. जो दर लागवडीला तोच दर काढणीला, असा नियम मजुरांनी केल्याने काढणीला देखील अकरा ते बारा हजार रुपये एकराने पैसे द्यावे लागले. सर्वत्र काढणीची झुंबड उडाल्याने मजुरांचा तुटवडा झाल्याने बाहेरगावावरुन मजूर आणावे लागले. त्याचा वाहतूक खर्च अंगावर पडला. इंधन दरवाढ झाल्याने नांगरणीपासून वाहतुकीपर्यंत सर्वांचीच दरवाढ झाली. काढलेला कांदा टेलरमध्ये भरण्यासाठी सहाशे रुपये टेलर दर झाला. तर वाहतुकीसाठी देखील सहाशे रुपये टेलर दर झाला. अंतर जास्त असेल तर दर आणखी जादा मोजावा लागला. साधारणपणे दहा ते बारा बायांंनी एका दिवसात एक एकर कांदा काढला. त्यामुळे त्यांना दिवसाला हजार ते बाराशे रुपये रोजंदारी मिळाली. तर टेलरमध्ये कांदा भरणार्‍या मजुरांना देखील हीच रोजंदारी मिळाली. त्यामुळे मजुरांची चांदी झाली. कधी नव्हे ते यंदा अत्यंत मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची व खतांची विक्री झाल्याने कृषीसेवावाल्यांची ही चांदी झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊन देखील आज मजूर तुपाशी अन् शेतकरी उपाशी अशी बिकट अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे.

Related Stories

No stories found.