ऑनलाईन शाळा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा विचार
सार्वमत

ऑनलाईन शाळा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा विचार

पालकमंत्री हसन मुश्रीफ : मंगळवारी आमदार लंके व तंत्रस्नेही शिक्षक गुंड यांच्यासमवेत मुंबईत बैठक

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतील ऑनलाईन शाळा हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा शासनाचा मानस असून त्यासाठी येत्या मंगळवारी आमदार लंके तसेच तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या समवेत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

आ. लंके यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हाती घेण्यात आलेल्या ऑनलाईन शाळा उपक्रमाचे मुश्रीफ यांच्या हस्ते राळेगणसिद्धीत उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी आ. लंके यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी आ. निलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रातिधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, पारनेर शहराध्यक्ष कविता औटी, पंचायत समितीचे उपसभापती सुरेश धुरपते, अ‍ॅड. राहुल झावरे, जयसिंंग मापारी, अरुण पवार, बापूसाहेब शिर्के आदी उपस्थित होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, करोनाच्या संकटामुळे एकत्र शाळा भरविणे, मुलांना एकत्र आणणे शक्य नाही. मुलांना घरात बसवून ठेवणे योग्य नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग राबविण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी तसे प्रयोग राबविले जात आहेत. आमदार निलेश लंके यांनी ऑनलाईन शाळेची सुरुवात केली असून त्याचे मी मनापासून स्वागत करतो.

देशात पहिल्या क्रमांकाची हायटेक शाळा उभी करण्याचा लंके यांचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची शाळा उभी करण्याचा तसेच ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा मानस असून त्यासाठी मंगळवारी मंत्रालयात आ. लंके, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी आमदार लंके म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विविध शाळांचे शिक्षक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सोशल मीडियाच्या या माध्यमामध्ये मर्यादा असल्याने अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे अनुभव आले.

ते दूर करून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी संदीप गुंड यांच्या दीप फाउंडेशनच्या मदतीने गेल्या तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. पारनेर नगर मतदारसंघातील 15 हजार विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेउन घरबसल्या डिजिटल शिक्षणाचे धडे घेणार आहेत. या सॉफ्टवेअरचा राज्यातील सर्व शाळांसाठी निश्चित उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com