भेंड्यातील गोळीबारात एकजण जखमी

दोन संशयित ताब्यात
भेंड्यातील गोळीबारात एकजण जखमी

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. यामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे हा 21 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत जखमी सोमनाथ बाळासाहेब तांबे याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन दोघांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ तांबे याने जबाबात म्हटले की, मी लांडेवाडी (भेंडा) येथे आईसह राहत असून श्री. मारुतराव घुले पाटील पतसंस्थेत काम करून कुटुंबाची उपजीविका करतो.

2 मे रोजी रात्रीचे जेवण करून मी नेहमीप्रमाणे माझा मित्र स्वप्नील बाबासाहेब बोधक याचे रहाते घराचे पाठिमागे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेलो. माझ्यासोबत सुजित बाबासाहेब बोधक, विजय जगधने, संदीप सोनकांबळे, सचिन गायकवाड, संजय गायकवाड, अरुण बोधक, किरण सातारे, शुभम गर्जे, आकाश सावंत, समीर हसन शेख व स्वप्नील बाबासाहेब बोधक असे व्हॉलीबॉल खेळत असताना रात्री सव्वानऊच्या सुमारास खेळता-खेळता बॉल हा देवगाव ते लांडेवाडी रस्त्याकडे गेला.

Title Name
27 हजाराला रेमडेसिवीरची विक्री; एकाला अटक
भेंड्यातील गोळीबारात एकजण जखमी

मी सदरचा बॉल घेण्यासाठी रस्त्याकडे गेलो, परंतु रस्त्याचे बाजूस अंधार असल्याने बॉल शोधून घेत असताना रस्त्यावर समोर एक पल्सर मोटारसायकल उभी असल्याचे व एक इसम गाडीवर बसलेला होता तर दुसरा गाडीच्या बाजुला उभा होता. दरम्यान मला बॉल दिसल्याने तो दोन्ही हाताने उचलता क्षणीच माझे छातीत मधोमध काहीतरी लागल्याचे व समोर पाहिले असता उभ्या असलेल्या इसमाने त्याचे दोन्ही हातात पिस्तूल सारखे दिसणार्‍या शस्रातून माझ्यावर फायर केल्याचे व त्याचे हातात असल्याचे दिसले.

त्यानंतर मला प्रचंड वेदना झाल्याने मी खाली कोसळलो. सदर मोटारसायकल वरील दोघे इसम हे गाडी चालू करून देवगावचे दिशेने पळून गेले. मैदानावरील सर्व खेळाडू माझ्याजवळ आले व मी त्यांना मला छातीत काहीतरी लागले असे त्यांना सांगितले. त्यावर मला सर्वांनी उचलून मर्क्युरी हॅलोजन लावलेल्या ठिकाणी आणून पाहिले असता मला झालेली जखम ही फायर केल्यानंतर लागलेल्या गोळीची असावी असे सर्वजण बोलू लागले. त्यानंतर मला स्वप्नील बाबासाहेब बोधक याने त्याची स्कार्पिओ गाडीतून सोबत शुभम गर्जे, सागर सोपान महापूर यांनी श्वास हॉस्पिटल नेवासा फाटा येथे आणून भरती केले. माझ्या छातीत गोळी झाडणारा इसम हा शरीर यष्टीने गणेश पुंड सारखा दिसत होता. तसेच मोटारसायकलवर बसलेला इसम हा पप्पू जावळे सारखाच दिसत होता असा मला संशय आहे.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांचेशी संपर्क साधला असता जखमी सोमनाथ तांबे याने संशयित म्हणून नावे घेतलेले पप्पू जावळे व गणेश पुंड यांना पोलिसांनी संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तपास सुरू असल्याची माहिती श्री.करे यांनी दिली.

अपर पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांची भेट

दरम्यान अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन व्हॉलीबॉलचे मैदान व गोळीबार घडल्याच्या ठिकाणची पहाणी केली. नगर येथून पाचारण करण्यात आलेल्या टीमने मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने निकामी झालेली बुलेट केस शोध मोहीम राबविली. यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक भरत दाते उपस्थित होते.

आताच गोळी काढण्यात धोका...

नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गोळी सोमनाथचे छातीत मधोमध घुसून हाडात रुतून बसल्याने तो थोडक्यात बचावला असल्याचे त्याच्यावर उपचार करणारे डॉ. अविनाश काळे व पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले. सध्याचे परिस्थितीत ऑपरेशन करणे धोक्याचे असल्याने गोळी अद्याप काढली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com