इंदोरी | वार्ताहर | Indori

कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर इंदोरी फाटयाजवळील मातोश्री लॉन्सच्या पुर्वेला बोलेरो व निळवंडे धरणाच्या साहित्याची वाहतूक करणार्या

ढंपरची समोरासमोर धडक झाल्याने बोलेरोमधील एक महिला ठार झाली. तर बोलेरो मधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र हा अपघात रस्त्याचे काम सुरु असल्याने संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे झाले असल्याने नागरिकांनी याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या.

रुंभोडी येथील प्रसिध्द कांदा व्यापारी बाबु शेख यांचा मुलगा सोहेल हा आपल्या पत्नी व आई समवेत बोलेरोमधून अकोलेहून आपल्या घरी रुंभोडीकडे चालले होते. काल सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास निळवंडे धरणाकडून अकोलेकडे साहित्य घेवून जाणारा ढंपर यांच्यात मातोश्री लॉन्स जवळ चंद्रभान देशमुख यांच्या घराजवळ जोरदार धडक झाली. या धडकेत सोहेल शेख, त्याची पत्नी मुस्कान शेख, आई जतिया शेख हे गंभीर जखमी झाले. शेजारील ग्रामस्थांनी व रस्त्यावरील नागरिकांनी थांबून अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना बाहेर काढत तातडीने रुग्ण वाहिकेतून अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र या दरम्यान मुस्कान शेख या महिलेचा मृत्यू झाला. व सोहेल शेख व जतिया शेख यांना उपचारासाठी पुढे संगमनेरला हलविण्यात आले.

मात्र हा अपघात ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाला असल्याचे वास्तवदर्शी चित्र दिसून आले. या रस्त्याचे काम सुरु असल्याने संबंधित ठेकेदाराने एकाच बाजूचे डांबरीकरण केले असून सर्व वाहन चालक याच ट्रॅकवरुन धावण्यासाठी धडपड करीत असतात. गेली कित्येक दिवसांपासून दुसर्या साईडचे काम रेंगाळले असल्याने हा अपघात झाला असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. त्यामुळे या मृत्यूस संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकामचे अधिकारी हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.