...जेव्हा मृतदेह तटकन उभा राहतो तेंव्हा !

केलवड ग्रामस्थ व राहाता पोलिसांमुळे एकाला मिळाले जिवदान
...जेव्हा मृतदेह तटकन उभा राहतो तेंव्हा !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गावात मृतदेह असल्याची खबर पोलिसांना मिळते... पोलिस येतात, मृतदेहाजवळ पोहचतात त्यांना मृताचे डोळ्यांची हालचाल दिसते...आणि तो उठुन बसतो!

राहाता तालुक्यातील केलवड हद्दीत शिर्डी बायपासला केलवड गावापासून 1000 फुट अंतरावर एका चिंचेच्या झाडाखाली दोन दिवसांपासून एक व्यक्ती निपचित पडल्याचे व ती मृत असावी असे गावकर्‍यांचे लक्षात येते. याची माहिती पोलिस पाटील सुरेशराव गमे यांना मिळते. तेथे पोहचण्यापूर्वी ते राहाता पोलिसांना या प्रकाराची माहिती देतात.

राहाता पोलिस ठाण्याचे पेलिस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मागदर्शनाने पोलिस त्या ठिकाणी पोहचतात. एक 55 वर्षांचा काळी पँट आणि पांढरा शर्ट घातलेला आणि दाढी वाढलेली असा बेवारस इसम मृत झाला असावा म्हणुन त्याच्या जवळ पोहचतात. राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक पंकज व्यवहारे, पोलिस नाईक चंद्रकांत भोंगळे व पोलिस शिपाई इफ्तिकार सय्यद हे त्याच्या मृतदेहाची पाहणी करु लागतात. पोलिस नाईक पंकज व्यवहारे यांना त्या इसमाचे डोळे हालल्याचे निदर्शनास येते. आणि ही व्यक्ती जिवंत असल्याची खात्री सर्वांना होते.

लागलीच पाणी आणि ओआरएस आणले जाते. उर्जा पेय त्याला दिले जाते आणि तो हालचाल करु लागतो. सर्वांना समाधान मिळते. आणि तो उठून उभा राहातो.

त्याच्या अंगावर कपडे खराब झालेले असल्याने पोलिस पाटील सुरेशराव गमे यांनी त्यांच्या घरुन एक ड्रेस आणण्यास सांगितले. तोपर्यंत त्यास चहा बिस्किट त्याला दिला जातो. आणि काही ग्रामस्थ त्याला आंघोळ घालतात. व ड्रेस त्याला परिधान करतात. त्याच्या त्या कपड्यातील खिशात पत्ता, मोबाईल नंबर सापडतो. तो इसम जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरचा असल्याचे सिध्द होते. पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क केला. तो स्वभावाने शांत असल्याचे व मानसिक हळवा असल्याची माहिती पोलिसांनी मिळते. सदरच्या इसमाचे नाव पंकज चंद्रकांत सोनवणे असे असून तो 55 वर्षांचा आहे. रेल्वेत तो कमर्शिल विभागात सेवेत आहे. अशी माहिती मिळते. पोलिसांनी त्याला इथे कसा आलास? त्यावर त्यांने आपण इथे कसे आलो, हे माहित नसल्याचे सांगितले.

दरम्यान सदर इसमाच्या पोटात अन्नाचा कणही काही दिवसांपासून नव्हता. त्याला कमालीचा थकवा आल्याने तो निपचीत पडून होता. काहींना तो मृतदेहच आहे, त्यांनी पोलिस पाटील गमे यांना ही माहिती दिली. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिल्यावर तो जिवंत असल्याचे समजले. पोलिस आणि ग्रामस्थ यांनी त्याचा जिव वाचविला. त्याबद्दल केलवड ग्रामस्थ, पोलिस पाटील आणि राहाता पोलिसांचे कौतुक होत आहे.

राहाता पोलिसांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले, तेथे उर्जा देणारे ओआरएस दिले. आणि पोलिसांनी त्याला जेवण दिले. त्याचा भाऊ त्याला घेण्यासाठी येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com