मुळा धरण उजवा कालव्याचे गेट दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी

मंत्री गडाख यांच्या प्रयत्नाला यश
मुळा धरण उजवा कालव्याचे गेट दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी
मुळा धरण

नेवासा (तालुका प्रतिनिधी) / Newasa - जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या प्रयत्नाने मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या गेट मधून होणारी पाण्याची गळती व पाण्याचा अपव्यय थांबून अधिक कार्यक्षमपणे  पाण्याचे नियोजन करणे शक्य व्हावे म्हणून 64 नविन गेट्स  व दुरुस्तीच्या कामासाठी एक कोटीच्या  निधीला मंजूरी मिळाली आहे.

मुळा धरणाच्या (Mula Dam) उजव्या कालव्याच्या गेटमधून होणारी  पाण्याची गळती व पाण्याचा अपव्यय थांबून अधिक  कार्यक्षमपणे  पाण्याचे नियोजन करणे शक्य व्हावे म्हणून मुळा पाटबंधारे विभागा-अंतर्गत मुळा उजवा कालव्यावर पाहिल्या टप्प्यात 64  नविन गेट्स  बसविणेसंदर्भात व आवश्यक तिथे दुरुस्ती करणेची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी साधारण एक कोटी इतक्या निधीची आवश्यकता होती.

निधी अभावी ही कामे रखडली होती. मात्र  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकारराव गडाख पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर  अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक या कार्यालयामार्फत देखभाल व दुरुस्ती अंतर्गत या कामासाठी  एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.  त्यामुळे नेवासा तालुक्यातील कालव्यावर  गेट्स बसविण्याचे व आवश्यक तिथे  दुरुस्ती करण्याचे काम  पुढील आठवड्यापासून (सोमवार) चालू करण्यात येणार असल्याची माहिती नामदार गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर राहुरी उपविभागात 9,  नेवासा तालुक्यातील घोडेगाव उपविभागात 12,  नेवासे उपविभागात 12,  चिलेखनवाडी उपविभागात 11 तर आमरापूर उपविभागात  20 अशाप्रकारे एकूण 64 गेट्स बसविण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात उजव्या कालव्यावरील उर्वरित 150 गेट्सची कामे करण्यात येणार असून त्यासाठी अंदाजित 1कोटी 80 लाख रुपये इतका निधी लागणार असून सदर निधीही लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नामदार गडाख यांनी सांगितले.

 मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावरील कार्यरत साधारण सर्व गेट्सचे आयुष्यमान संपुष्टात आल्याने बर्‍याच ठिकाणी गेट्सची  फुट-तूट व मोड तोड झाली होती. त्यामुळे संबंधित चारीचे पाणी चालू-बंद करताना अडचणी येत होत्या. गेट्स सुस्थितीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन पाण्याचा अपव्ययही होत होता.

आता या कामासाठी मंजुरी व निधी मिळाल्याने लवकरच सर्व गेट्सची कामे होऊन ती  सुस्थितीत झाल्यानंतर पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून आवर्तनामध्ये सुरळीतपणा येऊन शिस्त लागण्यास मदत होणार आहे.  सदरील कामे लवकरात लवकर व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने ना. गडाख यांनी मुळा पाटबंधारे विभागाचे नाशिक येथील अधिक्षक अभियंता व नगरचे कार्यकारी अभियंता यांना सूचना दिल्या.

नामदार गडाख यांनी या कामात जातीने लक्ष घालून सातत्याने पाठपुरावा केल्याने अनेक दिवसांपासून रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागल्याने नेवासा तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com