गुढीपाडव्यानिमित्त विवेक कोल्हे यांनी साधला करोनाबधित रुग्णांशी सवांद

गुढीपाडव्यानिमित्त विवेक कोल्हे यांनी साधला करोनाबधित रुग्णांशी सवांद

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी येथील कोविड सेंटरला भेट देउन गुढीपाडवा दिनानिमित्त रूग्णांना पुरणपोळीच्या जेवणाचे

वाटप केले. त्यांचेशी संवाद साधत कोरोनाबाधित रूग्णांना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. कमी पडत असलेले औषधे, सिलेंडर आणि ऑक्सीजन मशीनची गरज लक्षात घेउन तातडीने कोविड सेंटरला सिलेंडरसह ऑक्सीजन मशीन व औषधे उपलब्ध करून दिले.

यावेळी श्री. कोल्हे म्हणाले, आज देशात संकटजन्य परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. कोपरगाव तालुक्यातही रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे या संकटाला आपल्या सर्वांना एकजुटीने सामोरे जायचे आहे. आपण सर्व एका कुटूंबातील असून घाबरून न जाता या संकटाचा मुकाबला करायचा आहे. रूग्णांना समस्यांची विचारपूस करत आपण सर्वजण मिळून यातून लवकरच बाहेर पडू, असा धीर दिला.

ज्या ज्यावेळी तालुक्यावर संकटाची परिस्थिती निर्माण झाली. त्या त्यावेळी संजीवनी उद्योगसमुह नेहमीच मदतीला धावून येत असतो. अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी करोना महामारीच्या सुरूवातीपासून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपक्रम राबविले आहे. करोना आजारापासून बचाव होण्यासाठी नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आदींसह सुरक्षिततेच्या साहित्याचा पुरवठा करत नागरिकांना लसीकरणासाठी मोलाची मदत करीत आहे.

गेल्या वर्षभरापासून या प्रसंगाला सामोरे जात असताना येणार्‍या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकास तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रूग्णांना तुटवडा जाणवत असलेल्या औषधांचा तातडीने पुरवठा करण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांचेशी संपर्क करून औषधे उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, शिवाजी खांडेकर, जनार्धन कदम, रविंद्र रोहमारे, सागर जाधव, प्रमोद नरोडे, दिपक जपे, वैभव गिरमे, जगदीश मोरे, शुभम काळे उपस्थित होते. यावेळी कोविड सेंटरला काम करत असलेल्या वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांशी संवाद साधत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नागरिकांना सुविधा देत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

संजीवनीने दिली खर्‍या अर्थाने संजीवनी

डॉ. आदित्य पाटील यावेळी म्हणाले, एसएसजीएम कॉलेज येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये रूग्णांना ऑक्सीजन सुविधा देण्यासाठी येणारी अडचण विवेक कोल्हे यांचे पुढे मांडली असता क्षणाचाही विलंब न करता तातडीने ऑक्सीजन मशीन, सिलेडर आणि औषधे उपलब्ध करून दिल्याने रूग्णांना संजीवनीने खर्‍या अर्थाने संजीवनी देण्याचे काम केले असल्याचे डॉ पाटील म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com