भागानगरे खून प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग

मुख्य आरोपींना केली मदत || पोलीस मागावर
भागानगरे खून प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग

अहमदनगर |प्रतिनिधी\ Ahmednagar

ओंकार उर्फ गामा भागानगरे यांचा खून केल्याचा आरोप असणार्‍या मुख्य तिघा जणांना चौघांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्या तिघांना आणखी दोघांनी मदत केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. ते दोघेही पसार झाले असून एलसीबीसह तोफखाना पोलीस त्यांच्या मागावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपींची संख्या नऊवर पोहचली आहे.

ओंकार भागानगरे, ओंकार घोलप व इतरांनी गणेश हुच्चे याच्या अवैध धंद्याची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावरून बालिकाश्रम रस्त्यावर ओंकार भागानगरे यांचा खून झाला होता. या प्रकरणी घोलपच्या फिर्यादीवरून गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मदत करणारे रवी नामदे, वैभव हुच्चे, सागर गुडा आणि अनिकेत साळुंके यांनाही गुन्ह्यात घेतले असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा यांना मदत करणार्‍या आणखी दोघांची नावे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. त्यांच्या हालचाली सीसीटिव्हीमध्ये दिसून येत असून त्यांचे घटनास्थळावरून आरोपींना फोन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हल्ला करतेवेळी वापरलेल्या तलवारीही यातील एकाने दिल्या असल्याचे समोर आले आहे. त्यांना अटक केल्यानंतरच त्याविषयी अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com