
अहमदनगर (प्रतिनिधी)
अवैध धंद्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार उर्फ गामा भागानगरे यांचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले गणेश केरूप्पा हुच्चे व नंदु लक्ष्मण बोराटे (दोघे रा. माळीवाडा) यांना न्यायालयाने वाढीव एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्यांना मदत करणार्या चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
ओंकार भागानगरे, ओंकार घोलप व इतरांनी गणेश हुच्चे याच्या अवैध धंद्याची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केल्याने ओंकार भागानगरे यांचा खून झाला होता. या प्रकरणी घोलपच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात गणेश हुच्चे व नंदू बोराटे यांना अटक केली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (दि. 27) संपली होती. त्यांना तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आणखी एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.