झेडपीच्या जुन्या इमारतीसाठी दोन कोटींच्या निधीची मागणी

अध्यक्षा घुले || पालकमंत्र्यांनी केली प्रस्ताव सादर करण्याची सूचना
झेडपीच्या जुन्या इमारतीसाठी दोन कोटींच्या निधीची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेची जुनी ऐतिहासिक इमारत आणि जुन्या सभागृहाच्या नुतनीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटींचा निधीची मागणी अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. दरम्यान, निधी देण्याचे आश्वासन देत त्यासाठी आधी प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.

गुरूवारी जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन सभा पार पडली. या सभेत अध्यक्षा घुले यांनी जिल्हा परिषदेच्या जुन्या ऐतिहासिक इमारत आणि अण्णासाहेब शिंदे सभागृहाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटींच्या निधीची मागणी केली. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे बांधकाम 1962 मध्ये करण्यात आलेले आहे. यासह त्यानंतर 1982-83 ला अण्णासाहेब शिंदे सभागृह बांधण्यात आलेले आहे. या दोन्ही वास्तू ऐतिहासिक असून त्यांचे जतन होणे आवश्यक आहे.

यातील शिंदे सभागृहाच्या दुरवस्थेबाबत दै. सार्वमतने वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर जुनी इमारत आणि सभागृहाची अध्यक्षा घुले आणि सभापती सुनील गडाख यांनी पाहणी केली होती. या पाहणीनंतर अध्यक्षा घुले यांनी पालकमंत्री यांच्याकडे निधीची मागणी नोंदवली आहे. दरम्यान, या वस्तूंच्या नुतनीकरणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर आग्रही असून पुण्यातील संस्थेकडून या इमारतीचे ऑडिट केले असून राज्य सरकार पातळीवरून देखील निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

नेवासा तालुक्यातील तरवडी येथे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे संग्रहालय स्थापन करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी अध्यक्षा घुले यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com