वृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

वृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले तालुक्यातील राजूर येथे पिकअप मागे घेत असताना जोराची धडक देऊन पायावरून व कमरेवरून गाडी घालून अनुसया संतु पथवे (वय 75) या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. परवाना नसलेल्या अल्पवयीन मुलास गाडी चालविण्यास दिली म्हणून संदीप विश्वनाथ वाळे (रा.राजूर ता. अकोले) या दोघांविरुद्ध राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सिंधुबाई रामनाथ पथवे (वय 48, राहणार राजूर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या सासुबाई अनुसया संतु पथवे तीन महिन्यापूर्वी 13 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर भोकनळ यांच्या दवाखान्यात बरे वाटत नसल्याने औषधोपचारासाठी चालल्या होत्या. त्यांना दम लागल्याने त्या संदीप वाळे यांच्या वेल्डिंगच्या दुकाना समोरील बदामाच्या झाडाच्या सावलीखाली बसल्या होत्या. त्यावेळी संदीप वाळे यांची पिकअप एम एच 17 बी डी 706 ही सर्वोदय राजूर येथील यांच्या वेल्डिंग दुकानासमोर उभी होती. त्यांच्या मुलाने सदरची गाडी मागे घेताना गाडीची धडक अनुसया यांना बसली.

गाडीचे चाक त्यांच्या पायावरून व कमरेवरून गेल्याने त्या जबर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचाराकरता अकोले येथील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना बरे वाटल्यानंतर 16 जुन 2023 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर राजुर येथील डॉक्टर भोकनळ यांच्याकडून वेळोवेळी औषधोपचार करून त्यांच्या जखमांना मलमपट्टी करीत होतो. दिनांक 26 जून 2023 रोजी पहाटे पाच वाजता अनुसया पथवे या मयत झाल्या. त्यावेळी आमची खात्री झाली की त्यांना झालेल्या जखमांमुळेच अनुसया पथवे यांचा मृत्यू झाला. मी माझे पती व मुले त्यांच्या मृत्यूच्या दुःखात असल्याने सदर फिर्याद देण्यास उशीर झाला. आज दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी राजुर पोलीस स्टेशन ला फिर्याद देण्यात आली आहे.

संदीप विश्वनाथ वाळे व त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार 304 अ, 279, 338 तसेच मोटार वाहन अधिनियम 180, 184, 181 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी रमेश वाडेकर करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com