जुनी पेन्शन योजना लागू करा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागणी
जुनी पेन्शन योजना लागू करा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, 31 ऑक्टोबर 2005 रोजी महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या शासन अधिसूचनेद्वारे राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर शासन सेवेत दाखल होणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना (महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 व नियम 1984) रद्द करण्यात येऊन अन्यायकारक शेअर मार्केट आधारित नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (DCPS/NPS) लागू करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी काळ्याफिती लावून आजचा दिवस पाळून नव्या पेन्शन योजनेचा जाहीर निषेध नोंदवत आहोत. नव्या पेन्शन योजनेत निश्चित अशा पेन्शनची कोणतीही हमी नाही व ग्रॅच्युइटी तर नाहीच त्यामुळे आज कर्मचार्‍यांचे मृत्यू व सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अंधारमय झाले असून महाराष्ट्रातील सहा लाख कर्मचार्‍यांमध्ये नव्या पेन्शन योजनेत विरुद्ध व सरकार विरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे.

शासकीय आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आज अखेर 1659 कर्मचारी मयत झाले असून जुनी पेन्शन ग्रॅच्युईटी अभावी या मयत कर्मचार्‍यांची कुटुंबे आज अत्यंत हलाखीची परिस्थिती जगत आहेत. खरंतर हा मयत कर्मचार्‍यांचा आकडा यापेक्षाही जास्त आहे शिवाय जे बरेच कर्मचारी नव्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचीही स्थिती अतिशय वाईट आहे कारण त्यांनाही ग्रॅच्युईटी नाही आणि पेन्शनच्या नावावर केवळ एक ते दीड हजार रुपये इतकी तुटपुंजी रक्कम मिळत आहे.

तर दुसरीकडे आज देशातील पाच राज्य सरकारांनी म्हणजे पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड व पंजाब यांनी नुकतेच त्यांच्या राज्यातील कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली आहे जर ही राज्ये जुनी पेन्शन योजना लागू करू शकतात तर मग महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्यात सामाजिक सुरक्षितता असलेली जुनी पेन्शन योजना का लागू केली जात नाही? गेल्या सात ते आठ वर्षापासून महाराष्ट्रातील सहा लाख कर्मचारी जुनी पेन्शन मागणीसाठी लढा देत आहेत ज्याचे साक्षीदार आपण स्वतः आहात.त्यामुळे आता महाराष्ट्रात तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करून न्याय करावा, अन्यथा महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी लोकशाही मार्गाने तीव्र संघर्ष करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते शिवाजी आव्हाड, तालुका अध्यक्ष निलेश हारदे, वस्ती शाळा शिक्षकांचे संगमनेर तालुका अध्यक्ष हरिभाऊ सहाणे, विकास साठे, किरण कटके, रवी धाकतोडे, भाऊसाहेब घोडे, गुंजाळ, किरण फटांगरे, मच्छिंद्र ढोकरे, दिघे, गाडेकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com