वृद्ध आईला घरातून हाकलून दिले ; मुलावर गुन्हा

राहुरी खुर्द येथील घटना
वृद्ध आईला घरातून हाकलून दिले ; मुलावर गुन्हा

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे पोटच्या मुलाने आपल्या वयोवृद्ध आईला घरातून बाहेर हाकलून दिल्याची लाजीरवाणी घटना गेल्या मार्च महिन्यात घडली. वयोवृद्ध आईने पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना पोलिसांसमक्ष कथन केली. साहेब मला न्याय द्या, अशी आर्त हाक पोलिसांना दिली.

तालुक्यातील राहुरी खुर्द येथील मित्र परिवार कॉलनीमध्ये अनुसया सीताराम डोळस ही 60 वर्षीय महिला तिचा मुलगा संदीप, सून व नातवंडासह राहत होती. मार्च महिन्यात घरगुती कारणावरून आई व मुलामध्ये भांडण झाले. तेव्हा मुलाने आईला घरातून बाहेर हाकलून दिले. गेल्या दोन महिन्यांपासून वयोवृद्ध आई परिसरातील ओळखीच्या लोकांकडे राहून हलाखीचे जीवन जगत आहे. दि. 29 मे रोजी त्या वयोवृद्ध आईने पोलिसांत धाव घेऊन पोलिसांना न्याय देण्याची विनंती केली.

अनुसया सीताराम डोळस या वयोवृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून तिचा मुलगा संदीप सीताराम डोळस याच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक अणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

60 वर्षापुढील स्त्री किंवा पुरूषाचा आपल्या स्वतःच्या मालमत्तेतून आपले मुले, नातेवाई किंवा पाल्य आपली काळजी घेण्यास निष्काळजीपणा किंवा नकार देत असतील तर आपण कायदेशीर उदरनिर्वाहाची मागणी करू शकता. तसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू शकता. आरोपीला तीन महिन्यापर्यंत तुरूंगवास अथवा पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसोबत असे काही प्रकार घडत असतील तर त्यांनी ताबडतोब पोलिसांची मदत घ्यावी. त्यांना निश्‍चितच न्याय मिळेल. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

No stories found.