90 वर्षांच्या आजीबाईंनी हरवले करोनाला

उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मानले आभार
Corona
Corona

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील 90 वर्षांच्या आजीबाईंनी करोनावर मात करुन उपचारांना प्रतिसाद दिला तर रुग्ण बरा होऊ शकतो हे दाखवून दिले. या आजीबाईंसह एकूण पाच रुग्णांनी करोनावर मात केली. त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आजीबाईंनी उपचार करणार्‍या डॉक्टर, नर्सस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तुम्ही माझ्यावर चांगले उपचार केले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘डॉक्टर्स डे’ च्या दिवशी रुग्णांकडून मिळालेली ही पावती या डॉक्टरांनाही मनात जपून ठेवावीशी वाटली.

22 जून रोजी नगर शहरातील या आजीबाईंना त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव आला. दरम्यान, प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना 2-3 दिवस तेथील आयसीयू कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने आणि कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. या आजीबाईंसह नगर शहरातील इतर दोन रुग्ण तसेच श्रीरामपूर येथील एका रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला तर पुणे येथे उपचार घेत असलेल्या एका रुग्णासही डिस्चार्ज मिळाला.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 312 झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 149 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14 जण मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 475 झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com