जुन्या वादातून राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांत तुंबळ हाणामारी

जुन्या वादातून राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांत तुंबळ हाणामारी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सुमारे सात महिन्यांपूर्वी राहुरी शहरात गावठी कट्ट्यातून फायर झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी दोन गटांत झालेला वाद आज पुन्हा उफाळून आला. आणि राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना काल घडली आहे.

राहुरी शहरातील एकलव्य वसाहत येथे सुमारे सात महिन्यांपूर्वी दोन गटांत वाद निर्माण होऊन गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून दोन्ही गटात धुसफूस सुरू होती. तो वाद पुन्हा उफाळून आल्याने काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात त्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही गट एकमेकांवर तूटून पडले होते. सात महिन्यांपूर्वी राहुरी शहरातील एकलव्य वसाहत येथे माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर येथील तरुणाने गोळीबार करत हल्ला केला होता.

त्यावेळी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट सह प्राणघातक हल्ला करणे या कलमान्वये सोनाली बर्डे यांच्या फिर्यादीवरून नामदेव पवार, अमर पवार, अंकुश पवार यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या आरोपींची जामिनावर सुटका झाली असून तेव्हापासून पवार, माळी व बर्डे या कुटुंबात कायम धुसफूस सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात तुंबळ हाणामार्‍या झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये चांगलीच पळापळ झाली होती. पोलीस पथकाने तात्काळ काही महिला व पुरूषांना ताब्यात घेतले.याबाबत उशीरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com