30 लाखांच्या चोरीप्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

चार जणांविरोधात गुन्हा दाखल ; 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
30 लाखांच्या चोरीप्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद
जेरबंद

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

सुरत येथील व्यापार्‍याच्या तेलाचा अपहार करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना संगमनेर शहर पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपये रोख असा 9 लाख 83 हजार 859 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण पसार आहे.

सुरत येथील एल. के. टी. लॉजिस्टिक कंपनीच्या माध्यमातून फॉर्च्यून सोया ऑईलचे डबे एम. एच. 17 ए.जी. 7789 या ट्रकमधून 30 लाख 6 हजार रुपये किमतीचे तेलाचे डबे पुणे येथील बसंत ट्रेडिंग कंपनी यांना पोहोच करायचे होते. या तेलाचा मध्येच अपहार झाला होता. तेलाचे डबे पुणे येथील कंपनीला पोहोच झाले नसल्याचे निदर्शनास आल्याने अशोक कुमार रामनिवास चौधरी, रा. सुरत यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरवातीला अरुण उदमले व ट्रक मालक अफजल खान साहेब खान पठाण दोघे रा. संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तेलाच्या या चोरी प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचे उदमले याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा सखोल तपास केला. यानंतर मुख्य आरोपी पर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी नरेंद्र राजेंद्रसिंग रोतेला (वय 41, रा. पाईपलाईन रोड,अहमदनगर), अनिल भारत मिरपगार रा. तारकपूर,अहमदनगर, किशोर पदुने रा. वाळूंज, पंढरपूर औरंगाबाद व अजय कांबळे यांच्याविरुद्ध गु.र.न.295/2021 भादंवि कलम 406 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या आहेत.

दरम्यान या चोरी प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर ट्रक चालक अरुण उदमले तसेच ट्रक मालक अफजल खान पठाण यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, आपण सुरत येथे गेलो सुरत येथील मोडासा ट्रान्सपोर्ट यांच्याकडे गेलो असता त्या ठिकाणी अजय कांबळे नावाचा एक इसम आला. आपण बसंत ट्रेडिंग कंपनी पुणे या कंपनीचा कर्मचारी असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार 30 मे रोजी ट्रकमध्ये माल भरला. यावेळी सर्व कागदपत्रे अजय कांबळे याने ताब्यात घेतले. दि. 31 मे रोजी आपण हा माल घेऊन संगमनेरला आलो.

आमचे गाडीचे भाडे संगमनेर पर्यंत ठरले होते. त्यामुळे आपण गाडी संगमनेर येथे उभी केली. त्यानंतर संजय नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला आणि गाडी खेडपर्यंत घेऊन ये असे त्याने सांगितले. त्यानुसार दि. 31 मे रोजी आपण हा माल खेडपर्यंत आणला. या ठिकाणी अजय कांबळे याने ट्रक मधील तेलाचे डबे दुसर्‍या ट्रकमध्ये टाकले. आपण भाड्याची मागणी केली असता संजू भाडे देणार असल्याचे सांगण्यात आले मात्र त्याने आपल्याला भाडे दिले नाही.

यानंतर आपण बसंत ट्रेडिंग कंपनीला फोन केला असता तेलाचे डबे कंपनी पर्यंत पोहचलेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आपण संबंधित कंपनीला याबाबत माहिती दिली. तेलाचे डबे काष्टी येथे गेल्याची माहिती आपल्याला मिळाली. सदर तेलाचेे डबे काष्टी येथे पोहोच झाल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील अजय कांबळे हा आरोपी पसार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com