पुढील 5 वर्षात 2555 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे ऑईल कंपन्यांकडून नियोजन
सार्वमत

पुढील 5 वर्षात 2555 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे ऑईल कंपन्यांकडून नियोजन

2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे केंद्राचे धोरण निश्चित

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

देशातील साखरेची अत्यधिक उपलब्धता साखर कारखानदारीच्या उत्पादित साखरेच्या किंमतीवर विपरित परिणाम करीत आहे. यामुळे साखर कारखानदारीच्या तरलतेवर परिणाम होऊन ऊस दराची थकबाकी वाढत असल्याने केंद्र सरकारने सन 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे केंद्राचे धोरण निश्चित केले असून ऑईल कंपन्यांकडून पुढील 5 वर्षात 2555 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनी, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी व इंडियन ऑइल कंपनी या तीन कंपन्यांनी 01 डिसेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 25 या 5 वर्षात 2555 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे नियोजन केले आहे.त्यासाठी बुधवार दि.12 ऑगस्ट रोजी निविदा प्रसिध्द केली आहे. त्यानुसार दि.01 डिसेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी ऑइल कंपन्याना इथेनॉल पुरवठा करण्यासाठी पूरवठादारांची दीर्घकालीन नोंदणी व करार करण्यात येणार आहे. डिसेंबर 20 ते नोव्हेंबर 21या कालावधीत 465 कोटी लिटर, डिसेंबर 21 ते नोव्हेंबर 22 या कालावधीत 470 कोटी लिटर, डिसेंबर 22 ते नोव्हेंबर 23 या कालावधीत 500 कोटी लिटर, डिसेंबर 23 ते नोव्हेंबर 24 या कालावधीत 540 कोटी लिटर आणि डिसेंबर 24 ते नोव्हेंबर 25 या कालावधीत 580 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे.

इथेनॉल पुरवठा निविदा भरण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 ही असून निविदा पूर्व मिटिंग 19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे.

केवळ सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये इथेनॉल पुरवठा निविदा भरलेल्या आणि यशस्वीरित्या नोंदणीकृत असलेल्या निविदादारांना, इथनॉल साखर वर्षासाठी 2020-21 च्या इथनॉलच्या मात्रासाठी कोट्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. याच इथेनॉल पुरवठादार कंपन्यांनाच यावेळी निविदा भरता येणार आहे. याच कंपन्यांना पुढील 2021-25 या वर्षासाठी ही निमंत्रित करण्यात येणार आहे. निविदा भरताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रकल्प सुरू करण्यासाठी संमती (सीटीओ) प्रमाणपत्र व पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था (पीइएसओ) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे.

भारतात 12 राज्यात एकूण 231 इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वयीत आहेत. देशाची इथेनॉल निर्मितीची प्रतिदिन क्षमता 145.89 लाख लिटर आहे. सर्वात जास्त प्रकल्प महाराष्ट्रात (96) आहेत. त्या खालोखाल उत्तरप्रदेश (55), कर्नाटक (29), गुजरात व तामिळनाडू प्रत्येकी 12 प्रकल्प आहेत.

नगर जिल्ह्यातील 23 साखर करखान्यांपैकी केवळ 9 कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प आहेत. नगर जिल्हयातील इथेनॉल प्रकल्प असणारे साखर कारखाने व त्यांची दैनिक इथेनॉल उत्पादन क्षमता अशी,

1) ज्ञानेश्वर - 30 हजार लिटर

2) प्रवरा  - 60 हजार लिटर

3) गंगामाई - 60 हजार लिटर

4) अशोक  - 20 हजार लिटर

5) अंबालिका - 60 हजार लिटर

6) साईकृपा - 60 हजार लिटर

7) संजीवनी - 60 हजार लिटर

8) राहुरी - 20 हजार लिटर

9) कोलपेवडी - 45 हजार लिटर

एकूण - 4 लाख 15 हजार लिटर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com