सुरेगावात उद्या व्यावसायिकांची करोना तपासणी करणार

सुरेगावात उद्या व्यावसायिकांची 
करोना तपासणी करणार

कोळपेवाडी (वार्ताहर) - कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीतील किराणा दुकानदार, हॉटेल चालक, मालक, बँक कर्मचारी, फळे, भाजीपाला विक्रेते व सर्व दुकानातील कामगार यांची उद्या (सोमवारी) ग्रामपंचायतीच्या मार्फत व प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी यांच्या सहकार्याने करोना तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती सुरेगाव करोना दक्षता समितीच्या वतीने सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर व ग्रामविकास अधिकारी एन.डी खेडकर यांनी दिली.

तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सुरेगाव हद्दीतील सर्व दुकानदार, दुकानातील कर्मचारी, बँक कर्मचारी, हॉटेल्स कर्मचारी व मालक व इतर आस्थापना फळे व भाजीपाला विक्रेते यांची कोविड तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. मागील काही दिवसांपासून सुरेगावमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी सुरेगाव ग्रामपंचायतीने सुरेगावातील सर्वच दुकानदारांना कोविड तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी सुरेगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व त्याचे सहकारी सकाळी दुकानदार व त्यांच्या दुकानातील कर्मचारी व फळे, भाजीपाला विक्रेते यांची करोना तपासणी करणार आहे.

सर्व विक्रेत्यांना ही तपासणी करणे बंधनकारक आहे. जे दुकानदार किंवा इतर वर्गातील कर्मचारी करोना तपासणी करणार नाहीत त्यांची दुकाने व आस्थापने मंगळवारपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. दुकानदारांनी अशा प्रकारची कारवाई करण्याची वेळ येऊ नये व सुरेगावला कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून तपासणी करून घेण्याचे आवाहन सुरेगाव करोना दक्षता समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com