
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दत्तात्रय हरिभाऊ जाधव (वय 35 रा. चिचोंडी पाटील ता. नगर) यास प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर व्ही. यार्लगड्डा यांनी भादंवि कलम 353, 332, 504, 506 प्रमाणे दोषी धरले. जाधवला दोन वर्षांचे चांगल्या वर्तवणुकीच्या प्रतिज्ञापत्रावर सोडण्यात आले. दोन वर्षांत त्याने कोणताही गुन्हा केल्यास त्याला वरील कलमान्वये पुन्हा शिक्षा देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तसेच सदर खटल्यातील फिर्यादी राजेंद्र शिवाजी कुलांगे यांना मारहाण केल्याप्रकरणी 15 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. सदर खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मंगेश वसंतराव दिवाणे यांनी काम पाहिले. 23 फेब्रुवारी, 2021 रोजी दुपारी फिर्यादी व त्यांचे सहकारी चिचोंडी पाटील गावात बस स्टॅण्ड जवळ ओम बेकर्स अॅण्ड डेअरी समोरील अतिक्रमण काढीत असताना त्याचे मालक दत्तात्रय जाधव व फिर्यादी कुलांगे यांच्यात वाद झाले होते.
फिर्यादी व त्याचे सहकारी यांना जाधवने शिवीगाळ करून मारहाण केली होती. ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जाधवविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे आलेला पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.