भाजपमुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला - आ. विखे

आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी |वार्ताहर| Loni

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची नेहमीच होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळेच आरक्षण गमवावे लागले होते.ओबीसीचे आरक्षण पुर्ववत होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलै प्रयत्न आणि भारतीय जनता पक्षाने केलेल्या संघर्षाचा मोठा विजय असून, ओबीसी समाजालाही या लढ्यामुळे न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयात बांठीया आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा सादर झालेला इंम्पिरीकल डेटा ग्राह्य धरुन ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मार्ग आज मोकळा झाला. या निर्णयावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आ.विखे पाटील म्हणाले, ओबीसी समाजाला 27 टक्के राजकीय आरक्षण मिळावे ही भूमिका भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी मांडली. परंतू मागील आघाडी सरकारच्या काळात या आरक्षणाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाला. विरोधी पक्षनेते या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संघटीतपणे संघर्ष करून या सरकारचे वेळकाढू धोरण चव्हाट्यावर आणले.

नाकर्तेपणानाकर्तेपण ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले होते. कोर्टाच्या आदेशानंतर नेमलेल्या आयोगाला कोणतीही मदत आघाडी सरकार करु शकले नाही. न्यायालयातही बाजू मांडण्यात कमी पडल्याने ओबीसी समाजाला आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी संघर्ष करावा लागला. या संघर्षात भारतीय जनता पक्षाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही आपली भूमिका प्रभावीपणे मांडून न्यायालयालयीन लढाईतही मोठे योगदान दिले याकडे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांठीया आयोगाचा अहवालही वेळेत न्यायालयात सादर व्हावा चांगला पाठपुरावा केला. आरक्षणाच्या संदर्भात कायदेशिर बाजू मांडण्यासाठी वकीलांची फौज उभी केली. या सर्वांचा सकारात्मक परिणाम आजच्या निकालातून स्पष्ट झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी विधानसभेत आणि रस्त्यावर येवून केलेल्या संघर्षाचे हे यश असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com