
वीरगाव | वार्ताहर
चित्रकार मीनानाथ खराटे यांनी काढलेल्या सुरेख रांगोळ्यांची आणि फुग्यांची लक्षवेधक सजावट, वाटेवर अंथरलेला रंगीबेरंगी फुलांचा गालिचा, नऊवार साड्या परिधान केलेल्या मुलींच्या झांज पथकाच्या निनादात, ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी होत झालेले आनंददायी स्वागत, कार्यक्रमात अंगावर शालीऐवजी घातलेली 'फडकी' आणि कार्यक्रमानंतर जेवणासाठी असणारा मासवडी आणि बाजरीची भाकरी असा असाल अस्सल गावरान बेत...
मुंबईत वाढलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून स्वित्झर्लंडमध्ये शिकणारी न्यासा अजय देवगण हे ग्रामीण, मराठमोळं आदरातिथ्य पाहून भारावून गेली. निमित्त होते अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वीरगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमाचे.
'रुरल रिलेशन' या संस्थेचे प्रमुख प्रदीप लोखंडे यांच्या 'ग्यान की' या उपक्रमाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील काही शाळांना ग्रंथालयासाठी पुस्तके देण्यात आणि खेळाचे साहित्य देण्यात आले. लवकरच २५ शाळांना ऑडिओ लायब्ररी देण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री काजोल यांच्या 'एनवाय' फाउंडेशनचे त्यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.
या शाळांना लायब्ररी देण्याचा कार्यक्रम वीरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अजय देवगण यांची कन्या निसा उपस्थित होत्या. ‘एनवाय‘ फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक मीना अय्यर तसेच फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी मुंबई येथून खास या कार्यक्रमासाठी आले होते. आलेल्या पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अकोले तालुक्यातील आदिवासी महिलांचे पारंपरिक वस्त्र असलेली 'फडकी', अकोल्यात पिकणारा तांदूळ, राजूर येथील नवाळी यांचे कुंदी पेढे, अगस्ती ऋषींची प्रतिमा देऊन निसाचा सत्कार करण्यात आला. या स्वागताने न्यासा भारावून गेली.
प्रदीप लोखंडे, त्यांची कन्या युगांती लोखंडे, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख एकनाथ पटेकर,मुख्याध्यापक शैला भोईर, तसेच विविध शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक,वीरगाव ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे समन्वयक भाऊसाहेब चासकर यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. तसेच विद्यालयात सुरू असणाऱ्या वाचनविषयक उपक्रमांचा आढावा घेतला.
वाचनाची आवड असणाऱ्या सिद्धी तोरकड, ओमकार अस्वले, विद्या डोळस, प्रगती पानसरे, वेदांत वाकचौरे आणि साईराज पराड या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. स्वतःच्या वाचनाचा आणि आवडलेल्या पुस्तकाचा आढावा त्यांनी भाषणातून घेतला. वाचनातून आलेली समज आणि आत्मविश्वास याची झलक मुलांच्या बोलण्यातून दिसत होती. प्रदीप लोखंडे यांनी हसत खेळत मुलांबरोबर संवाद साधताना आयुष्यात जे आवडते ते करा असे सांगतानाच वाचा, लिहा, बोला, ऐका आणि खेळा असा सल्ला मुलांना दिला.
न्यासा देवगण हिने मुले हेच देशाचे भवितव्य आहे. मुलांना त्यांची इच्छा असेल ते शिक्षण मिळाले पाहिजे. सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. तुम्ही खूप पुस्तके वाचा असे तिने सांगितले. आपल्याला वाचायला आवडते असे सांगताना आपण अलीकडेच वाचलेले पुस्तक कोणते असे विचारता तिने भगवतगीता असे उत्तर दिले. ‘तुम्हाला काय व्हायचे आहे?‘ या प्रश्नाला तिने सफाईने बगल दिली.युगांती लोखंडे,मिना अय्यर यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमानंतर पाहुण्यांसाठी मासवडी आणि बाजरीची भाकरी असा जेवणाचा गावरान बेत होता. ‘ही कोणती डिश आहे?‘ असे उत्सुकतेने विचारत निसा आणि इतरांनी आवडीने मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेतला. हे स्वागत अपूर्व होते असे सांगत आई वडीलांना या परिसरात घेऊन येईन, असा शब्द देत तिने वीरगावकरांचा निरोप घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक स्कूल समितीचे अध्यक्ष भिमाशंकर मालुंजकर,समितीचे सर्व सदस्य,सुदर्शन ढगे, संभाजी वैद्य, रामनाथ वाकचौरे, भास्कर आंबरे, रावसाहेब सरोदे, अनिता भालेराव, देविदास गिऱ्हे, श्रीराम धराडे, सविता उगले, दिघे, वाकचौरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अजय आणि काजोल देवगणची होणार भेट
झालेल्या उपक्रमाबद्दल पत्र लिहीण्याचे आवाहन त्यांनी जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना केले. उत्कृष्ट पत्रव्यवहार करणा-या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना सिने अभिनेता अजय देवगण आणि काजोल देवगण यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घडवून देण्यात येईल असा शब्द न्यासा देवगण यांनी दिला. जि.प.प्राथमिक शाळेचे मातृभाषेतील शिक्षणातूनच भविष्यातील आदर्श नागरिक तयार होईल असे सांगून निसा यांनी सर्व शिक्षकांचेही कौतुक केले.