पोषण आहाराच्या सोशल ऑडिटमध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण

शिक्षक परिषदेचा आरोप || प्रत्येक प्राथमिक शाळेकडून 10 ते 25 हजारांची वसुली
पोषण आहाराच्या सोशल ऑडिटमध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या आदेशानुसार शालेय पोषण आहार योजनेचे सोशल ऑडिट सुरू आहे. यात श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी व नेवासा तालुक्यातील शाळांचे पूर्ण झाले आहे. प्राथमिक शाळांच्यावर गेल्यानंतर प्राथमिक शिक्षकांकडून शालेय पोषण आहार योजनेची मागील तीन वर्षांची कागदपत्रे मागितली जात आहेत. यात अपेक्षित कागदपत्रे उपलब्ध केली किंवा न केली तरी प्रत्येक शाळेकडून 10 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाने शिक्षण संचालक स्तरावरुन कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद शालेय पोषण आहाराच्या सोशल ऑडिटसाठी केलेली असतांनाही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आर्थिक शोषण कशासाठी केले जाते आहे, असा प्रश्न जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने उपस्थित केला आहे. प्राथमिक शिक्षक शालेय पोषण आहार योजना प्रामाणिकपणे प्रत्येक शाळेवरील वाडी वस्तीवरील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहेत. शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी अतिशय चांगल्या प्रकारे करत असतांना देखील त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑडिटच्या नावाखाली होणार्‍या वसूलीमुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शासनाच्या विविध योजना राबविण्यामध्ये प्राथमिक शिक्षक नेहमी अग्रभागी असतो. निवडणुकीच्या कामापासून तर शालेय पोषण आहार शिजवून देण्यापर्यंत प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करतात. परंतु प्राथमिक शिक्षकांना केवळ एखादा कागद नाही म्हणून 25 हजार रुपयेपर्यंत लाच मागितली जाऊन त्याचे मानसिक संतुलन खराब केले जात असेल तर ही जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या संदर्भामध्ये संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या असून या तक्रारींची दखल घेऊन तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आलेली आहे.

रविवार जिल्हा परिषदेला सुट्टी असल्यामुळे प्रत्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन सोमवारी जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, कार्याध्यक्ष राम निकम, सरचिटणीस दत्तात्रय गमे, कार्यालयीन चिटणीस गणेश वाघ यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.