नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

चोर्‍या, घरफोडीच्या घटना वाढल्या : नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नगर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतामधील विद्युत पंप, शेळ्या, दुचाकी चोरीच्या घटना तर दररोज घडत आहे. परंतु, रस्तालुट आणि घरफोड्यांचे प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसामध्ये तालुक्यातील जेऊर बायजाबाई, वाळकी, गुंडेगाव, जखणगाव शिवारात चोर्‍या, घरफोड्यांच्या घटना घडल्या.

याप्रकरणी नगर तालुका व एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दरम्यान वाढत्या चोर्‍या, घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नगर तालुक्याच्या ग्रामीण भागातून होत आहे.

शनिवारी पहाटे जेऊर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एक बंगला फोडला तर एका वस्तीवर चोरीचा प्रयत्न केला. महावितरण कंपनीच्या चौकातील प्रसाद अंतोन पाटोळे (वय 29) यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी अडीच तोळे सोने व सहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. पाटोळे कुटुंब जागे झाल्याने त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून चोरी करण्यात आली. याप्रकरणी प्रसाद पाटोळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच चोरट्यांनी श्रीधर तवले यांच्या वस्तीवर चोरीचा प्रयत्न केला. परंतु तिथे राजू तवले यांना जाग आल्याने चोरट्यांनी पोबारा केला. चोरी करताना एका चोराला दुखापत झाली असून पाटोळे यांच्या घराच्या परिसरात रक्त पडलेले दिसून आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस हवालदार रमेश थोरवे, पोलीस शिपाई संदीप आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, जेऊर परिसरात चोर्‍या व रस्ता लुटीचे प्रकार वाढले असून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शनिवारी रात्री वाळकी येथील हॉटेल राजहंस फोडून चोरट्यांनी 23 हजार 380 रूपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या लंपास केल्या. याप्रकरणी हॉटेलचे मालक लक्ष्मण नानासाहेब गोरे (वय 34 रा. वाळकी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. राजहंस हॉटेलच्या किचनचा दरवाजा तोडून चोरट्यांनी दारू लंपास केली आहे.

या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार लबडे करीत आहे. हिवरे बाजार रोडवरील जखणगाव शिवारात शौकत बशीर शेख (वय 35) यांच्या पाच शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी शेख यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेळ्या चोरीच्या घटना लक्षात घेता शेख यांनी एका खोलीमध्ये शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. चोरट्यांनी शेख कुटुंबीय झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावली व शेळ्या असलेल्या खोलीचे कुलूप तोडून पाच शेळ्यांची चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस नाईक गायकवाड करीत आहे.

ठराविक टोळ्या सक्रिय, पोलिसांचा तपास शुन्य

नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये दुचाकी, शेळ्या चोरी, विद्युत पंप चोरी करणार्‍या काही टोळ्या सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. त्याच बरोबर घरफोडी करणार्‍या टाळ्याही सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांकडून धारधार शस्त्रांचा वापर केला जात असल्याचे काही नागरिकांनी पाहिले आहे. या टोळ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. मात्र नगर तालुका, एमआयडीसी पोलिसांकडून गुन्ह्याची उकल केली जात नाही. गुन्ह्याची उकल करण्याचे प्रमाण कमी असल्याने चोरट्यांचे धाडस वाढले आहे. वारंवार घरफोडी, चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com