‘मनरेगा’मध्ये कर्जत तालुका प्रथम क्रमांकावर

21 कोटी रुपये खर्च, 5 हजार कामे पूर्ण
‘मनरेगा’मध्ये कर्जत तालुका प्रथम क्रमांकावर

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्ह्यात कर्जत तालुका प्रथम क्रमांकावर आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची अशी 21 कोटी रुपयांची 5 हजारांहून अधिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

प्रत्येक सरकारी योजनेचा कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी रोहयोच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांत अनेक कार्यशाळा घेतल्या. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, रोजगार सेवक, समन्वयक या सर्वांच्या समन्वयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत करायच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले. प्रांताधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, दोन्ही तालुक्यांचे बीडीओ, कृषी अधिकारी आणि त्या-त्या विभागांचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनामुळे कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके रोहयो अंतर्गत केलेल्या कामांमध्ये जिल्ह्यात आघाडीवर आहेत.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शाळेला संरक्षक भिंत बांधणे, गायगोठा, शेळी पालनाचे शेड, कुक्कुटपालनाचे शेड, फळबाग, शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, विहीरी, शोषखड्डे, घरकूल ही जामखेड तालुक्यात 10.85 कोटी रुपयांची तर कर्जत तालुक्यात 9.95 कोटी रुपयांची कामे करण्यात आली.

अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत पेव्हिंग ब्लॉक टाकण्यात आले आणि रस्तेही करण्यात आले असून आता ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीही बांधण्यात येणार आहेत. रोहयो अंतर्गत करावयाच्या कामांमध्ये समन्वय राखण्यासाठी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी एक अशा दोन समन्वयकांची नेमणूक करून अधिकार्‍यांच्या सहकार्याने अधिकाधिक लोकांना काम देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशा प्रकारे समन्वयक नेमणे आणि कार्यशाळा घेणे या दोन्ही गोष्टी केवळ कर्जत-जामखेड या दोन तालुक्यांतच होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके रोहयोअंतर्गत करण्यात येणार्‍या कामांमध्ये आघाडीवर असल्याचे दिसते.

रोहयोच्या माध्यमातून मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आणि अधिकाधिक सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रशासनाकडून त्यासाठी मोठे सहकार्य मिळत असल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे करता आली. भविष्यातही यासाठी प्रयत्न सुरुच राहतील.

- आमदार, रोहित पवार

पूर्ण झालेली कामे

शाळेला संरक्षक भिंत बांधणे - 35, गायगोठा - 1175, शेळीपालन शेड - 60, कुक्कुटपालन शेड - 24, फळबाग - 2180, शेततळे - 50, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड - 61, विहिरी - 130, शोषखड्डे - 1500, एकूण कामे - 5112

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com