आता साईभक्तांसाठी सीप्लेन सेवा

जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांचे प्रस्ताव मागवले
आता साईभक्तांसाठी सीप्लेन सेवा

बद्रीनारायण वढणे

अहमदनगर -

अहमदाबाद ते केवडिया सीप्लेनमधून प्रवास सुरू असून आता महाराष्ट्रासह देशभरात अशी सेवा सुरु होणार आहे. केंद्र सरकार यावर काम करत आहे.

महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डीसह लोणावळा आणि गणपतीपुळे यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर ही सेवा सुरु केली जाणार आहे. त्यासाठी जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांचे प्रस्ताव मागवले आहेत. ही सेवा झाल्यास भक्तांना साईदर्शनासह या हवाई प्रवासाचा वेगळा आनंद मिळणार आहे.

नदी, धरण किंवा समुद्रातून होणारं विमानाचं उड्डाण अंगावर काटा उभा करतं. हा अनुभव सध्या भारतात अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर सुरु आहे. या प्रवासात देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उच्च पुतळा म्हणजेच स्टॅच्यु ऑफ युनिटी देखील पाहायला मिळतो. हा अनुभव घेणं अनेकांचं स्वप्न आहे. मात्र, देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये केलं होतं ही सेवा अहमदाबादच्या साबरमती नदीकिनार्‍यावरुन केवडिया दरम्यान आहे. आता आगामी काळात देशात अशाप्रकारे अनेक ठिकाणी सीप्लेन सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. यात दिल्ली-युमना रिव्हर फ्रंट-अयोध्या, मुंबई-शिर्डीसह अनेक मार्गांचा विचार सुरु आहे.

केंद्र सरकारच्या जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांचे प्रस्ताव मागवले आहेत. यात दिल्लीच्या यमुना नदी किनार्‍यापासून अयोध्या, टिहरी, श्रीनगर (उत्तराखंड) आणि चंडीगड, मुंबई ते शिर्डी, लोणावळा आणि गणपतीपुळे, सूरत ते द्वारका, मांडवी आणि कांडलासह अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप समुहासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. इच्छुक कंपन्यांना 22 जानेवारी 2021 पर्यंत केंद्राच्या या महत्वाकांक्षी योजनेवर प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

मुळा धरणापर्यंत..

मुंबईहून मुळा धरणापर्यंत सी-प्लेन सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित असून या सेवेद्वारे शिर्डी, शनि-शिंगणापूर आणि मेहेराबाद ही श्रध्दास्थाने जोडली जाणार आहेत. याचा लाभ भाविकांना होणार आहे. यापूर्वी मुळा धरणातील पाण्यात विमानउतरविण्याची चाचणी 2014-15 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर माशी कुठे शिंकली हे समजले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com