श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यात प्रत्येक मतदान केंद्रावर

प्रत्येकी एकेक मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी दोन व तीन तसेच एक शिपाई असे 850 कर्मचारी नियुक्त केले आहेत. पहिल्या प्रशिक्षणासाठी 15 केंद्राध्यक्ष, 27 सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी दोन 31 तीन 19 तर 31 शिपाई अशा 123 कर्मचार्यांनी दांडी मारली आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून 6 जानेवारी रोजी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पडले असून प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्यासाठी प्रत्यक्षपणे दररोज तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

येत्या 15 जानेवारी रोजी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतिची निवडणुक होत आहे.130 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 850 मतदान अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी प्रशिक्षण बुधवार दि 6 रोजी पहिले प्रशिक्षण खा. गोविंदराव आदिक सांस्कृतिक सभागृहात पार पडले. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी या प्रशिक्षणात निवडणूक मतदान पार पडतांना काय काळजी घ्यायची आहे. मतदान यंत्रात काही अडचण आल्यास काय उपाययोजना करावी, मतदान केंद्रात काय व कशी उपाययोजना करावी याबाबत सखोल माहिती दिली. मात्र मतदानाच्या दिवशी अभिमत मतदान कसे घ्यायचे, मशीन मध्ये तांत्रिक अडचण आल्यास काय करायचे, मतदान संपल्यावर मतदान यंत्र कसे सील करायचे याबाबत प्रत्यक्षातही प्रशिक्षण सूरु ठेवले आहे. यासाठी श्रीधर बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात एक मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून मतदान अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्षात येऊन प्रशिक्षण घेऊ शकतात असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

दरम्यान यामध्ये बेलापूर बुद्रुक ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन सुमारे 14 हजार 400 मतदार आहेत. तालुक्यातील टाकळीभान,बेलापूर खुर्द, पढेगाव,निपाणी वडगाव, वडाळा महादेव यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतिच्या निवडणूका होत आहेत.या निवडणुकीत 40 हजार 42 स्रिया तर 42 हजार 977 पुरुष असे एकूण 83 हजार 19 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.