मास्क न वापरणार्‍यांवर कारवाई करा - जिल्हाधिकारी भोसले
जिल्हाधिकारी डॉ. भोसले

मास्क न वापरणार्‍यांवर कारवाई करा - जिल्हाधिकारी भोसले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील निर्बंध शिथील केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. मात्र, याठिकाणी विनामास्क फिरणार्‍या आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणार्‍या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेेंद्र भोसले यांनी महानगरपालिका आणि तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त न पाळण्यास करोना संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध लागू शकतील. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी गुरूवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, रोहिणी नर्‍हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, हे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. कमी चाचण्या होणार्‍या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र, आता निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करावे. निर्बंध शिथील झाले असले तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. ज्याठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तात्काळ कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com