उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत मल्लांची डावपेचांची उधळण

तोडीस तोड असलेले बलदंड मल्ल एकमेकांना भिडले
उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत मल्लांची डावपेचांची उधळण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डीत तालुक्यात उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी मल्लांनी डावचेपांची उधळण करत उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तोडीस तोड असलेले बलदंड मल्ल एकमेकांना भिडले. कोणी भारंदाज, कोणी धोबीपछाड, तर कोणी मुलतानी डावपेचांनी प्रतिस्पर्धी मल्लांना आसमान दाखवले. तर काही अटीतटीच्या कुस्त्यात गुणांनी विजय मिळवला.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने नगर जिल्हा तालीम संघ, बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत नगर, नाशिक जिल्ह्यातीक मल्लांनी दुसर्‍या सत्राच्या शेवटपर्यंत आघाडी घेतली होती. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेतील खुल्या गटात अनिल ब्राम्हणे (नगर) याने तृतीय क्रमांक पटकाविला असून, या स्पर्धेची अंतिम कुस्तीची लढत सुदर्शन कोतकर (नगर) विरुध्द बाळू बोडखे (नाशिक) यांच्यात होणार आहे. रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाले होते. संध्याकाळ पर्यंत जळगाव, नंदुरबार, धुळे, नगर, नाशिक जिल्ह्यातील मल्लांचे कुस्त्यांचे सामने सलग सुरु होते.

कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी एस.एम. निर्‍हाळी उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात प्रेक्षकांची मोठी गर्दी केली होती. स्पर्धेचे आयोजक अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असून, यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पै. राजेंद्र शिरसाठ, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, मोहन हिरणवाले, सुनिल भिंगारे, महादेव आव्हाड, नाशिक जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बळकवडे, डॉ. शिवाजी खेडकर, संग्राम शेळके, योगेश रासने, नगरसेवक सुभाष लोंढे, हर्षवर्धन कोतकर, हिरामन वाघ, युवराज पटारे, शांताराम बागुल, गहिनीनाथ शिरसाठ, पंच गणेश जाधव, देवा पवार, बाळासाहेब घुले, रफिक शेख, दिगंबर गाडे, दिगंबर ढवण आदींसह मल्ल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

48 किलो वजन गटात प्रथम- संकेत सतरकर (नगर), द्वितीय- अंकुश भडांगे नाशिक, तृतीय- वैभव तुपे (नाशिक), 58 किलो वजन गटात प्रथम- पवन डोंगरे (नाशिक), द्वितीय- शुभम मोरे (नाशिक), तृतीय- महेश शेळके (नगर), 74 किलो वजन गटात प्रथम- महेश फुलमाली (नगर), द्वितीय- संदीप लटके (नगर), तृतीय- आकाश घोडके (नगर), 84 किलो वजन गटात प्रथम- ऋषीकेश लांडे (नगर), द्वितीय- विजय पवार (श्रीगोंदा), तृतीय- विकास गोरे (नगर) यांनी रोख बक्षिसे पटकाविली. कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एकलव्य परिवाराचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहे. कुस्ती स्पर्धेचे समालोचन शंकर अण्णा पूजारी करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com