
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिले. त्यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. जिल्हा विभाजन करताना दक्षिण जिल्ह्यास ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ तर उत्तर जिल्ह्याचे ‘साईनगरी’ असे नामांतर करावे, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी बुधवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना केली.
खा. लोखंडे म्हणाले,‘केंद्र सरकारचे छोटे राज्य, छोटे जिल्हे असावेत असे धोरण आहे. हेच धोरण राज्य सरकारने घ्यावे, एका लोकसभा मतदारसंघाचा एक जिल्हा केला तरी आमचा पाठिंबा राहील. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे. प्रशासनातील अधिकार्यांना काम करताना भौगोलिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात. लोकांना न्याय द्यायचा तर छोटे छोटे जिल्हे हवेत. मी पूर्वी दक्षिण जिल्ह्यात आमदार होतो, आता उत्तर जिल्ह्यात खासदार आहे.
दोन्ही ठिकाणी काम करतानाचा अनुभव लक्षात घेतला तर जिल्हा विभाजन आवश्यक आहे. दक्षिण जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. त्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले, महिलांना सक्षम केले. त्याचबरोबर साईबाबांमुळे शिर्डीचे नाव जगाच्या कानाकोपर्यात गेले आहे. त्यामुळे उत्तर जिल्ह्याचे नाव साईनगरी ठेवावे अशी ही मागणी खा. लोखंडे यांनी केली.
मुख्यालयाबाबत हुलकावणी
उत्तर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे असावे, याबद्दल बोलताना खासदार लोखंडे म्हणाले की, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता (शिर्डी) अशा विविध ठिकाणची मागणी नागरिक करत आहेत. परंतु सरकारला योग्य वाटेल त्याठिकाणी मुख्यालय करावे. परंतु नाव साईनगरी ठेवावे, असे ते म्हणाले.