श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर सेवकांचे महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत अनेकवेळा निवेदने, भेटी, बैठकी, आंदोलने होऊन देखील शासनाकडून शिक्षकेतर सेवकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. याच्या निषेधार्थ श्रीगोंदे येथे कामबंद आंदोलन करण्यात आले.
सेवांतर्गत सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनरुज्जीवीत करून सुधारीत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20 व 30 वर्षांची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवकांना लागू करणे, तात्काळ सातवा वेतन आयोगाचा 2016 ते आज अखेर फरकाची रक्कम अदा करणे,2005 नंतर सेवेत रूजू झालेल्या सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे, शिक्षकेतर सेवकांच्या वरील सर्व प्रश्नांबाबत शासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्यामुळे सर्व प्रकारचे कामकाज बंद करून बेमुदत संप सुरू केला असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात श्रीगोंदा येथील महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती, शाखा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला.