आता लस नाही तर रेशन व दाखले नाही

आता लस नाही तर रेशन व दाखले नाही
लस

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील ८० टक्केच्या वर ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित ग्रामस्थ मात्र लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. या हालगर्जीपणामुळे रूग्ण वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गाव लॉकडाऊन केले आहे.

लसीकरणासाठी हयगय करणाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीने लस नाही तर रेशन व ग्रामपंचायतीचे विविध दाखले न देण्याचे धोरण जाहीर केले आहे. तसेच येत्या १५ तारखेपर्यंत नियमीत सुरू असलेल्या लसीकरण कॅम्पमध्ये लसीकरण करून घेण्याचे आवाहन सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांनी केले आहे.

पिंपरी निर्मळ गावात करोना रुग्णसंख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गाव दहा दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. तसेच लसीकरणावरही भर दिला आहे. गावची लोकसंख्या सहा हजारांच्या आसपास आहे. १८ वर्षावरील लसीकरणाला पात्र संख्या साडेचार हजारांच्या आसपास असून गावात चार हजार दोनशे लसीकरण झाले आहे. उर्वरित नागरिकांच्या लसीकरण्यासाठी शासन पातळीवर नियमीत लसीकरण कॅम्पचे आयोजन केले आहे. मात्र नागरिकांकडून या लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे.

गावाला उपलब्ध झालेल्या लसी काही बेजबाबदार नागरिकांमुळे शिल्लक राहत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेतला आहे. गावतील नागरीकांची सुरक्षितता व हीत लक्षात घेता ज्या नागरिकडून लसीकरणाला टाळटाळ होत आहे अशा नागरिकांचे रेशन व दाखले बंद करण्याचे धोरण ग्रामपंचायतीने घेतले आहे. तसेच गावातील सर्व दुकानदार, त्यांचे कर्मचारी तसेच भाजीपाला विक्रेते यांच्या लसीकरणाची पडताळणी ग्रामपंचायत पातळीवर होणार असल्याने उर्वरित ग्रामस्थांसह व्यावसायिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com