30 जूनपर्यंत बदल्या नाहीत

30 जूनपर्यंत बदल्या नाहीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्याच्या विविध भागात करोनाने थैमान घातल्याने सन 2021-22 या चालू वर्षात दि. 30 जून, 2021 पर्यंत बदली अधिनियमानुसार अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्या स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काल जारी केले आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बदल्या करण्यात येतात. पण नव्याने आलेल्या शासन निर्णयानुसार 2020-21 या आर्थिक वर्षात करोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या अपवादात्मक परिस्थितीमुळे आणि विशेष कारणामुळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

चालू आर्थिक वर्षात 30 जून 2021 पर्यंत कोणत्याही बदल्या (सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे करावयाच्या बदल्या) करण्यात येऊ नयेत असे शासन निर्णयाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

याच बदल्या होणार..

- सेवानिवृत्त रिक्त होणारी पदे भरणे

- करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरणे

- शासकीय कर्मचार्‍यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची बदली करणार्‍या सक्षम प्राधिकार्‍याची खात्री पटल्यास करावयाची बदली.

शिक्षकांच्या बदल्यांनाही स्थगिती मिळणार

मे महिन्यांत जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, प्राथमिक शिक्षकांसह वर्ग 2 आणि वर्ग 3 या संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडत असते. गेल्यावर्षी करोना संकटामुळे सर्वात मोठा संवर्ग असणार्‍या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा होणार की नाही, याबाबत गोंधळ होता. यासह अन्य विभागाच्या बदल्यांबाबत हिच परिस्थिती होती. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने ऐनवेळी धावपळ नको यासाठी बदली पात्र कर्मचारी शिक्षकांची माहिती संकलित केली होती. आता शासनाने सर्वच बदल्या पुढे ढकलल्या असल्याने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग त्याला अपवाद ठरणार नाही. सर्व बदल्या शासनाच्या पुढील आदेशानुसार होतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com