ना रस्ते, ना रोजगार, पुणतांबा परिसर बेजार

ना रस्ते, ना रोजगार, पुणतांबा परिसर बेजार

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांब्यासह 11 गावातील रस्त्यांची अवस्था फारच दयनीय झाली आहे. त्यातच राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा येथील पर्यायी उद्योगाचा प्रश्न अघापही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे परिसराची अवस्था ना रस्ते ना रोजगार ग्रामस्थ झाले बेजार अशीच झालेली आहे.

पुणतांबा गावाला जोडणार पुणतांबा-रामपूरवाडी, वाकडी, जळगाव, जळगाव शिवरस्ता, पुरणगाव, पुणतांबा-जळगाव (जुना रस्ता) शिर्डी यासह अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. पुणतांबा -कोपरगाव या 21 किलोमीटर रस्त्यापैकी पुणतांब्याच्या बाजूने 7 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झालेले आहे. मात्र उर्वरित 14 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. पुणतांबेकरांना कोपरगावला जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था केव्हा संपेल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

विशेष म्हणजे रस्त्यांबरोबर परिसरात रोजगाराच्या संधीही नाहीत. 1984 मध्ये चांगदेव कारखाना बंद पडल्यानंतर पुणतांब्यात रोजगाराभिमुख पर्यायी उद्योग सुरु करण्यासाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी खूप प्रयत्न केले होते. कृषी मंत्री असतांना त्यांनी 14 ऑगष्ट 2014 रोजी खत प्रकल्पाचे भूमीपूजनही केले होते. मात्र सत्तांतर झाल्यामुळे हा प्रकल्प मागे पडला आहे व भविष्यात आ. विखे यांच्याशिवाय कोणी उद्योग सुरु करेल अशी कोणातही धमक व इच्छाशक्ती नाही. त्यामुळे सध्या तरी परिसरातील युवकांना रोजगारासाठी भटकांती करावी लागेल.

अनेक जण शिर्डी, कोपरगाव श्रीरामपूर येथे जाऊन रोजगाराची शोधाशोध करत आहेत. काही युवकांनी पुणतांब्यातून स्थलांतर करून नगर, औरगाबाद, पुणे, नाशिककडे आपला मोर्चा वळविला आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर पुणतांबा रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळूनही येथे आरक्षण सुविधा नाही तसेच लांब पल्ल्याच्या गांड्यांना थांबा नाही. त्याचा फटका येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पुणतांब्यासह 11 गावे राहाता तालुक्यात समाविष्ट आहे. मात्र विधानसभा मतदार संघासाठी या गावाचा समावेश कोपरगाव मतदार संघात येतो. त्यामुळे कोपरगावचे लोकप्रतिनिधी यांनी रस्ते तसेच पर्यायी उद्योगाबाबत पुणतांबा परिसरातील 11 गावात लक्ष घातले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. सध्या तरी परिसराची अवस्था ना घरका ना घाटका अशीच झाली असून परिसरातील शेतकरीवर्ग ग्रामस्थ खूपच बेजार झाल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com