ब्राम्हणगाव शिवारात नळ्यांचे काम होईना

चार वर्षांच्या पाठपुराव्याला अपयश; शेतकरी प्रशासनापुढे झाले हतबल
ब्राम्हणगाव शिवारात नळ्यांचे काम होईना

कोपरगाव (प्रतिनिधी)

तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात शेतकयांची शेती येसगाव ब्राम्हणगांव रस्त्याच्या कामामुळे बाधित झाली आहे. रस्ता कामात ठेकेदाराने पुर्वीच्या नळ्या काढून टाकल्या परिणामी या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साठले जाते. त्यातून कोट्यवधी रुपये किंमतीच्या पिकांची नासाडी होते. याबाबत गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करतो पण सिमेंट नळ्या काही टाकल्या जात नाही अशी तक्रार सुभाष शामराव गाडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी प्रशासनापुढे हतबल झाले आहेत.

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २७ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि पावसाचे प्रचंड पाणी अजूनही शेतात साठलेले आहे. त्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी मार्ग काढून न दिल्याने हे पाणी आजही साठलेले आहे. काम अत्यंत शुल्लक आहे पण ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि त्यांची यंत्रणा यांना त्याबाबत काहीही घेणेदेणे उरलेले नाही, या परिसरातील शेतकरी मात्र मेटाकुटीला आले आहेत. यापूर्वी २२ सप्टेंबर २०२० व त्यानंतर चालू पावसाळयात मोठ्या प्रमाणांत पाऊस झाला. शेतात हे पाणी तुंबून राहिले त्याबाबत तक्रारी केल्या पण प्रशासनाने शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी याठिकाणी सिमेंट नळया आणि सिमेंट आणून ठेवले. पावसाळ्यापूर्वी हे काम करावे म्हणून अनेकवेळा विनवण्या केल्या,. कार्यालयाचे उंबरठे झिजवले पण जाड कातडयाच्या या लोकांना शेतकऱ्यांच्या त्रासाची दया आली नाही.

दरवर्षी येथे शेतकरी कष्टाने पिके घेतात आणि पावसाच्या पाण्याने त्याची नासाडी होते. येसगांव ब्राम्हणगांव या रस्त्याचे काम २०१७ मध्ये आठशेरे ठेकेदाराने सुरू केले. गोदावरी डाव्या कालव्याजवळ पुर्वी अतिरिक्त पाणी वाहून जाण्यांसाठी कलवर्ट बांधून नळ्या टाकण्यात आल्या होत्या पण रस्त्याच्या कामात त्या काढून घेण्यात आल्या, काम सुरू असताना संबंधित शेतकऱ्यांनी ही बाब ठेकेदाराच्या लक्षात आणून दिली पण त्याने पूर्ण रस्त्याचे काम नळ्या न टाकताच केले. परिणामी एका शुल्लक चुकीची शिक्षा हे ९ शेतकरी भोगत आहेत. २७ व २८ सप्टेंबर २०२१ रोजी प्रचंड पाऊस झाला. वरच्या बाजुने पाण्याचा लोंढा आला तो जाण्यासाठी मार्ग नसल्याने या ९ शेतकऱ्यांच्या शेतात तो तुंबून राहिला. मुलाबाळांसह उपोषणाचा इशारा यापूर्वी दिला होता. त्यावर येथे सिमेंट नळ्या आणून टाकल्या गेल्या पण वर्ष उलटूनही त्या बसविल्या गेल्या नाही. पक्क्या स्वरूपाचे काम करून या पाण्याचा निचरा व्हावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे पण या कामाला १४६० दिवस उलटूनही मुहूर्त लागलेला नाही ही शोकांतिका आहे, अजून किती पावसाळ्यात आमची पिके उद्ध्वस्त होणार असे सुभाष गाडे यांनी विचारले आहे.

Related Stories

No stories found.