अहमदनगरमध्ये सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही
सार्वमत

अहमदनगरमध्ये सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही

पालकमंत्री हसन मुश्रीफ : लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यात लॉकडाऊनबाबत मतमतांतरे

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

नगर शहरासह जिल्ह्यात अद्याप करोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची गरज नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काय करायचे, याचे नियोजन प्रशासनाने केले आहे, अशा स्पष्ट शब्दांत सध्या तरी लॉकडाऊनची शक्यता नसल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील करोना चाचणी प्रयोगशाळेची क्षमता तिपटीपेक्षा अधिक वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकार परिषदेत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण असले, तरी लॉकडाऊन करावे लागेल, एवढी परिस्थिती हाताबाहेर गेली नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे नगरमध्ये सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही. करोनाची साखळी तोडायची असेल, तर नागरिकांनीच शिस्त पाळणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे आहे.

त्यासाठी आता यापुढील काळात कठोर भूमिका घेतली जाईल. लॉकडाऊन करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी, प्रशासन अशी सर्वांची मते जाणून घेतली. यात मतमतांतरे आहेत. आगामी काळात बकरी ईद आहे. शिवाय श्रावण असल्याने अऩेक सण आहेत. लॉकडाऊन केले तरी लोक घरात थांबणार नाहीत. लॉकडाऊनचा काळ आता गेला आहे.

मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात एकूण दोन हजार 775 रुग्ण असून, त्यातील एक हजार 786 रुग्ण गेल्या 10 दिवसांत वाढले आहेत. एकूण रुग्णांपैकी एक हजार 436 रुग्ण बरे झाले असून, एक हजार 287 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. राज्यात पहिली आयटीपीसीआर प्रयोगशाळा नगरमध्ये जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आली. तेथे रोज 300 नमुने तपासले जातात.

खासगी प्रयोगशाळांमध्ये हे प्रमाण 600 आहे. शिवाय अँटिजेनद्वारे आतापर्यंत दोन हजार 80 नमुने तापसण्यात आले. यात वाढ करण्यासाठी आणखी 50 हजार कीटची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता एक हजारपर्यंत करण्यात येणार आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जवळपास 96 टक्के रुग्णांना कोणतेही लक्षण दिसत नाहीत. ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या तीन ते चार टक्के असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

शिंदे यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष

करोनाच्या काळात पालकमंत्र्यांनी येथेच थांबले पाहिजे. त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला होता. त्याकडे मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता ‘नगरचा आढावा घेतल्याशिवया मी जेवण करत नाही. मी माझे काम करत आहे, शिंदे यांनी त्यांचे काम करावे’, असे सांगत मुश्रीफ यांनी शिंदे यांच्या आरोपाला फार महत्त्व दिले नाही.

खासगी रुग्णालयांचे ऑडिट होणार

करोनाच्या रुग्णांवर खासगी रुग्णालयातही उपचार केले जातात. तेथे उपचाराचे बिल जास्त येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, या सर्व गोष्टींचे ऑडिट होणार असल्याचे खासगी रुग्णालयांनी लक्षात घेतले पाहिजे. सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक आकारणी केल्यास संबंधितांवर कारवाई होईल, असेही ते म्हणाले.

बचेंगे तो नाचेंगे !

बकरी ईदसाठी सामूहिक नमाज पठण करण्याची मागणी वाढत असल्याकडे मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, श्रावण महिन्यात सण पण आहेत. मात्र असे करून चालणार नाही. सध्याची परिस्थिती पाहता सर्व सण घरातच साजरे केले पाहिजेत, असे सांगताना ‘बकरी ईद को बचेंगे तो मोहरम मे नाचेंगे’ असा उल्लेख त्यांनी केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com