घुलेवाडीचे सरपंच सोपान राऊत यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

घुलेवाडीचे सरपंच सोपान राऊत यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

संगमनेर (प्रतिनिधी) - तालुक्यातील राजकीयदृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी घुलेवाडी ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावानंतर काल विशेष सभा बोलावण्यात आली होती.

त्यात उपस्थित 17 सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने 16 मते पडल्याने अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे. या विशेष सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार अमोल निकम यांनी कामकाज पाहिले.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून घुलेवाडी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. या ग्रामपंचायत क्षेत्रात विविध शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, कारखाने असल्याने राजकीयदृष्ट्या या ग्रामपंचायतीला महत्त्व आहे. मागील मोठ्या कालावधीपासून घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्याविरोधात सदस्यांमध्ये खद्खद् सुरू होती. त्याचे पर्यावसान अविश्‍वास ठराव आणण्यात झाले. त्यानुसार काल (ता.5) अध्यासी अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली घुलेवाडी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली होती.

या सभेला सरपंच व 17 सदस्य असे सर्व 18 जण उपस्थित होते. यावेळी अविश्‍वास ठरावाच्या नोटीसमध्ये नमूद मुद्यांवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. सरपंच सोपान राऊत यांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर अविश्‍वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी 16 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर अवघ्या दोघांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ठरावाच्या बाजूने तीन चतुर्थांशपेक्षा अधिक मते असल्याने सदरचा अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला.

मात्र, सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने काल पार पडलेल्या विशेष सभेचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला असून त्यांचेकडील पुढील आदेशानुसार घुलेवाडीतील ग्रामसभेत याबाबत मतदानाची प्रक्रिया राबविली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेनंतरच घुलेवाडीचे सरपंचपद रिक्त होईल किंवा नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com