पेट्रोल हद्दपार करा

पेट्रोल हद्दपार करा

केंद्रीयमंत्री गडकरींचे नगरकरांना आवाहन

अकोले (प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलला हद्दपार करा, शेतकऱ्यांचा पेट्रोलचा खर्च वाचवा. शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता बनला पाहिजे, असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळं करता येणं शक्य आहे. भविष्यात रेल्वे, विमानं, गाड्या आणि कारखाने हायड्रोजनवर चालणार असल्याचा दावाही त्यांनी केला. माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचा ८१ वा अभिष्टचिंतन सोहळा काल शुक्रवारी अकोले येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ना. गडकरी बोलत होते.

पुढच्या महिन्यापासून फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या स्कुटर, रिक्षा, ट्रक, कार, बस बाजारात येणार आहेत. या संपूर्ण इथेनॉलवर चालू शकतील अथवा इथेनॉल व पेट्रोलच्या मिश्रणावर चालतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज गहू स्वस्त पण ब्रेड बिस्कीट महाग, फळे स्वस्त पण फळांचे रस महाग, टोमॅटो स्वस्त पण केचप महाग अशी स्थिती आहे. हा कच्चा माल वापरून शेतकऱ्यांच्या जीवनात संपन्नता कशी आणता येईल याचा विचार झाला पाहिजे असेही ते म्हणाले.

देशात १८६ मतदार संघांत ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊस हे शेतकरी विकासाचे मापदंड मानले गेले आहे. यावर्षी देशात ३४० लाख टन साखर उत्पादन झाले. ८० लाख टन साखर मागील वर्षीची शिल्लक आहे आणि देशाची गरज आहे फक्त २८० लाख टन त्यामुळे साखरे ऐवजी आता अन्य उत्पादनाकडे वळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

इथेनॉल ६० रु. लिटर आहे तर पेट्रोल १२० रु. संशोधनाने इथेनॉलचे कॅलरी मूल्य आता पेट्रोल एवढे झाले आहे. आपण दरवर्षी १० लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो. हे पैसे शेतकऱ्यांचे घरात गेले पाहिजेत. स्कुटर, रिक्षा, कार सर्वच गाड्या इथेनॉल वर चालणाऱ्या येत आहेत. इंधन म्हणून भविष्यात हैड्रोजन चा वापर होणार आहे.

हैड्रोजन मिशन साठी केंद्र सरकारने ३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या सर्वांसाठी पारंपरिक दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे असे सांगतानाच तरुण नेत्यांनी हे मिशन हाती घेत जिल्ह्यातून पेट्रोल हद्दपार करावे असे आवाहन त्यांनी केले. नगर-मनमाड रस्त्याचे काम बंद पडले आहे. या कामाची लवकरच फेरनिविदा काढण्यात येणार असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com