नितीन गडकरींचे चरण पुजन, मनसेचे अभिनव आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने नागरीक संतप्त
नितीन गडकरींचे चरण पुजन, मनसेचे अभिनव आंदोलन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

कल्याण - विशाखपट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे सहा वर्षापासून रखडलेले काम त्वरीत पुर्ण करावे यासाठी पाथर्डीत मनसेच्या वतीने आज केंद्रीय भुपृष्ठ रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या चरण पुजनाचा कार्यक्रम करुन अभिनव आंदोलन करण्यात आले.

मेहेकरी ते फुंदेटाकळी पर्यंतच्या 55 कि.मी. महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षापासून रखडलेले आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सुमारे 400 लोकांचे अपघातात बळी गेले आहेत. खासदार, आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. ते सुद्धा या रखडलेल्या कामाबाबत हतबल झाले आहेत.आज अखेर मनसेच्या आयोजित केलेल्या अभिनव आंदोलनासाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दर्शवत यात सहभाग नोंदवला.आज सकाळी पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नाईक चौकात केंद्रीय मंत्री नितींन गडकरी यांच्या चरणांची मंत्रोपचाराच्या जयघोषात विधीवत पूजा करताना आली.

महामार्गाचे काम येत्या पंधरा दिवसात सुरळीत झाले नाही तर नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पुढील उपोषण करुन आंदोलन करणार आहे.या पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,खासदार डॉ सुजय विखे,आमदार मोनिका राजळे,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे फोटो मनसेचे कार्यकर्ते गळ्यात घालून भीक मांगो आंदोलन करणार आहे.या आंदोलनातील गोळा झालेल्या पैशातून महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे असा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली, तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, शेवगावचे गणेश रांधवणे, मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.दिनकर पालवे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे,योगेश रासने, नगरसेवक, बंडू बोरुडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र ऊर्फ भोरू म्हस्के, आर,के चव्हाण, संदीप काकडे, राजू गिरी, सोमनाथ फासे, लक्ष्मण डांगे, अशोक आंधळे, एकनाथ सानप आदी सहभागी झाले होते.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा खेळखंडोबा दिल्लीच्या भाजप सरकारने केला आहे.आज खासदार विखे यांच्या वाढदिवस आहे. त्यांना आजच्या दिवशी रस्त्याच्या काम पूर्ण होण्याबाबत खासदारांनी प्रतिज्ञा करावी.खासदार पाथर्डीत येऊन वेगळ्या पद्धतीचे विधान करतात नेमकी त्यांचा काम काय आहे? खासदारांनी खाजगी ठेकेदार आणून त्यांचे कार्यकर्ते ठेकेदार केले आणि या रस्त्याचे वाटोळे केले.अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com