राजीनाम्याचे आव्हान आ. पवारांनी स्विकारले

प्रा. शिंदे यांना प्रतिआव्हान; धांडे यांची पत्रपरिषदेत माहिती
राजीनाम्याचे आव्हान आ. पवारांनी स्विकारले

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

माजी मंत्री राम शिंदे यांचे आमदारकीचा राजीनामा देण्याचे आव्हान आमदार रोहित पवार यांनी स्वीकारले आहे. आमदार राम शिंदे यांनीही त्यांच्या राजीनाम्यासह वेळ, ठिकाण आणि तारीख जाहीर करावी असे प्रतिआव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी दिले आहे.

रविवारी कर्जत येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी धांडे बोलत होते. धांडे म्हणाले, माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले आहे. या संदर्भात युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आमदार रोहित पवार यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी आ. पवार यांनी सर्व जनतेच्या समक्ष आपण आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहोत. राम शिंदे यांनी देखील विधान परिषदेचा आमदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी तारीख वार वेळ ठिकाण हे सर्व राम शिंदे यांनी जाहीर करावे. त्या ठिकाणी आपण राजीनामा घेऊन हजर राहू असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

धांडे पुढे म्हणाले की, विधान परिषदेमध्ये पक्षश्रेष्ठींच्या हातापाया पडून आमदार रोहित पवार यांची भीती दाखवून मागच्या दाराने राम शिंदे यांनी प्रवेश केला आहे. त्यांचा पाठीमागील निवडणुकीमध्ये तब्बल 42 हजार मतांनी दारुण पराभव झालेला आहे. रोहित पवार या नवख्या युवकाने राज्यात भाजपची सत्ता असताना व तब्बल बारा खात्याचे मंत्रीपद सांभाळलेल्या नेत्याचा पराभव केला. अजूनही त्यांना तो पराभव पचवता आलेला नाही हेच स्पष्ट होते. याउलट विद्यार्थी विद्यार्थिनी छोटे मुले महिला शेतकरी शेतमजूर सर्व जाती-धर्माचे नागरिक या सर्वांना आमदार रोहित पवार आजही त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत असे वाटते.

एक रूपया तरी जास्त निधी आणून दाखवा

आमदार रोहित पवार यांनी अडीच वर्षात आणलेल्या निधीपेक्षा प्रा शिंदे यांनी पुढील काळात एक रुपया तरी निधी जास्त आणून दाखवावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना कुठेही विरोध किंवा अडवणूक करणार नाही. जनतेच्या विकासासाठी आम्ही नक्कीच साथ देऊ. आणि केवळ भर दिवसा आमदार रोहित पवार यांचा पराभव केल्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा, कर्जत जामखेड मतदार संघातील जनतेची व विकासाची कामे केल्याचे स्वप्न पहावे असे आवाहन नितीन धांडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com