निराधार योजनेच्या 272 प्रकरणांना मंजुरी

पाथर्डी तालुका योजना समितीची पहिली बैठक संपन्न
निराधार योजनेच्या 272 प्रकरणांना मंजुरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या नविन पदाधिकार्‍यांची पहिली बैठक आज समितीचे अध्यक्ष वैभव दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एकूण 272 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघाल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी तहसीलदार संजय माळी, वरिष्ठ कारकून दळे, समितीचे सदस्य ज्ञानदेव केळगंद्रे, राजेंद्र नागरे, संतोष गरुड, रवींद्र पालवे, रुस्तुम खेडकर, हुमायुन आतार, मिराताई बडे आदी सदस्य उपस्थित होते.

या बैठकीमध्ये श्रावण बाळ योजनेची 113 प्रकरणे, संजय गांधी निराधार योजनेचे 145 प्रकरणे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजने चे 14 प्रकरणे, अशी एकूण 272 प्रकरणे मंजूर करण्यात आली.पाथर्डी तालुक्यामध्ये सुमारे अडीच वर्षापासून सदर प्रकरणे प्रलंबित होती. सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने विधवा, दुर्धर आजार, अपंग, कोरोनामुळे निराधार झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले. तसेच या पुढील काळात जेष्ठ नेते प्रताप ढाकणे, नामदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे काम अत्यंत पारदर्शकपणे व गरजू लाभार्थ्यांसाठी केले जाईल असे आश्वासन दिले.तसेच प्रशासनाला या योजनेतील दलालांचा बंदोबस्त करण्याच्या सूचनाही दिल्या.

तालुक्यातील विधवा, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त, वयोवृद्ध लाभार्थ्यांना तातडीने प्रस्ताव सादर करून संजय गांधी निराधार योजने चा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत. ज्या प्रस्तावामध्ये काही तांत्रिक त्रुटी व अपुर्ण कागदपत्रे असतील त्यांनी तहसील कार्यालयात संपर्क साधावा व पुर्तता करावी.

- वैभव दहिफळे, अध्यक्ष योजना समिती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com