मुसळवाडीसह नऊ गावची पाणी योजना आठ दिवसांपासून बंद

मुसळवाडीसह नऊ गावची पाणी  योजना आठ दिवसांपासून बंद

ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

माहेगाव (वार्ताहर) - मुसळवाडी सह नऊ गावच्या पाणी योजनेचा पाणीपुरवठा थकबाकी अभावी पाटबंधारे विभागाने बंद केला आहे. गेली आठ दिवसापासून नऊ गावच्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी नाही. ही योजना ऐन उन्हाळ्यात बंद असल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आल्याने ग्रामस्थामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही योजना बंद पडल्याने ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे.

मुसळवाडी सह नऊ गावची योजनेची महावितरणासह पाटबंधारे विभागाची 53 लाख रुपये थकबाकी झाली असून पाटबंधारेची 8 लाख रुपये थकबाकी असल्याने पाटबंधारे विभागाने पाणी पुरवठा बंद केला आहे. नऊ गावच्या ग्रामपंचायतकडे अनेक वर्षांपासून योजनेची थकबाकी असुन ग्रामपंचायती नळ पाणी पुरवठ्याची वसुल करतात परंतु योजनेकडे पैसेच भरत नसल्याने सदर थकबाकी झाली आहे. सर्वच ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना अडचणीत सापडली आहे. ग्रामस्थांनी पैसे भरुन ही ग्रामपंचायती नेमके या पैशाच काय करतात हा संशोधनाचा विषय झाला आहे. मुसळवाडी व इतर नऊ गावे माहेगाव, मालुंजे, खुडसरगाव, पाथरे खुर्द, शेनवडगाव, कोपरे, वांजुळपोई, तिळापूर आदी नऊ गावातील नागरिकांना पाणी योजना बंद असल्यामुळे करोना महामारी मध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या योजनेकडे अनेक महिन्यापासून संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्षीतपणामुळे उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाची तीव्रते मुळे जनावरे व ग्रामस्थ यांचे मोठे हाल होत आहे. गावातील जनतेचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा व या योजने संदर्भात तालुका पंचायत समिती अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून या योजनेद्वारे तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवा अशी होत आहे.

लाभधारक गावच्या सरपंच व ग्रामसेवकांची 7 एप्रिलला बैठक

आ. लहू कानडेंच्या प्रयत्नामुळे योजना दुरुस्तीचा मार्ग मोकळा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुसळवाडी व इतर 9 गावांच्या नादुरुस्त पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न आ. लहू कानडे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये उपस्थित केला होता. त्यानंतरच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही योजना दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून ताबडतोब शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व गावच्या सरपंचांची, ग्रामसेवकांची बैठक गटविकास अधिकारी राहुरी यांनी दि. 7 एप्रिल 2021 रोजी बोलावली आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या जिल्हा आराखड्यामध्ये सदरच्या योजना दुरुस्तीसाठी त्यावेळेस 8 कोटी रुपयांची तरतूद होती, परंतु महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना ही बाब माहितच नसल्याची किंवा सदरची योजना दुरुस्त करण्याचे अजिबात भान नसल्याचे जिल्हा नियोजन मंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये उघड झाले होते.

तथापि आ. लहू कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सर्व्हे करुन अंदाजपत्रक तयार करण्याचे नाटक केले. परंतु तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक श्री. सराफ यांच्या मनाविरुध्द सदरची घटना घडत असल्याने मुख्य रायझींग मेन व फिल्टर प्लॅन्ट नव्याने दुरुस्त करण्याऐवजी त्यांनी थातुरमातुर दुरुस्त्या सुचविल्या. वास्तविक योजनेमध्ये समाविष्ट सर्व गावांना पाणी पोहचत नाही कारण मुख्य पाईपलाईन सदोष आहे तेथे चांगल्या दर्जाचे पाईप टाकून नवीन व्हॉल्व्ह बसवणे आवश्यक आहे. तसेच मुसळवाडी तलावातून मिळणारे पाणी तलावात उगवलेल्या वनस्पतीमुळे व शेवाळामुळे दुर्गंधीयुक्त होते. त्यासाठी योजनेला नवा फिल्टर प्लॅन्ट आवश्यक आहे. तलावातील वनस्पतींचा नायनाट करून तेथे आवश्यक त्या सुधारणा करणेही गरजेचे आहे. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सदरची कामे करण्याचे नाकारले.

आ. लहू कानडे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दि. 8 मार्च 2021 रोजी त्यांना सविस्तर लेखी पत्र दिले व या सर्व संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून योजना असूनही पाण्यापासून वंचित असणार्‍या 10 गावांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवावा, अशी विनंती केली. त्यानुसार पाणीपुरवठा मंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना लेखी सूचना देऊन सर्व गावांच्या ग्रामसभा घेऊन गावकरी म्हणतील त्या पध्दतीने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून ताबडतोब शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सदरच्या योजनेमध्ये समाविष्ट असणार्‍या सर्व गावच्या सरपंचांची, ग्रामसेवकांची बैठक गटविकास अधिकारी राहुरी यांनी दि. 7 एप्रिल 2021 रोजी बोलावली आहे. सदरच्या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्व अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

आ. लहू कानडे यांनी सदरची बैठक मुसळवाडी येथेच घ्यावी, अशी सूचना केली आहे. अशा प्रकारे आ. लहू कानडे यांच्या प्रयत्नाने मुसळवाडी व इतर 9 गावांसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com