
निमगावजाळी |वार्ताहर| Nimgavjali
संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या, एक बोकड ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
निमगावजाळी-गोगलगाव रस्त्यावर गट नंबर 1006/1 चे शिवारात मिना चंद्रकांत थेटे यांचे क्षेत्र आहे. चंद्रकांत थेटे हे सकाळी गोठ्यात गेल्यानंतर त्यांना शेळ्या मयत आढळून आल्या. या हल्ल्यात चार शेळ्या, एक बोकड ठार झाला आहे. बिबट्याने रात्रीच्यावेळी शेळ्यांवर हल्ला करून त्यांना आपले भक्ष केले. याबाबत मयुर थेटे याने वनविभागाचे श्री. पुंड, सोनवणे यांना माहिती दिली.
यानंतर वनरक्षक बाळासाहेब डेंगळे, अशोक गिते यांनी सदर ठिकाणी येऊन घटनेचा पंचनामा केला. मयुर थेटे यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. एक मादी, एक नर व बिबट्याचे बछडेे यांचा वावर सातत्याने या परिसरात दिसून येत आहे. तरी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.