निमगावजाळी परिसरात वादळी पाऊस; लाखोंचे नुकसान

निमगावजाळी परिसरात वादळी पाऊस; लाखोंचे नुकसान

निमगावजाळी |वार्ताहर| Nimgav Jali

संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी व परिसरामध्ये रविवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह रोहिणी बरसल्या. वादळाने परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर अनेक घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडाले. पॉली हाऊसचेही मोठे नुकसान झाले. या वादळी पावसाने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्णतेमध्ये मोठी वाढ झाली होती. दिवस रात्रीच्या उकाड्याने नागरीक हैराण झाले होते. यंदा मान्सूनपूर्व पाऊसही झाला नाही. त्यामुळे सर्वांचीच अस्वस्थता वाढली होती. अखेर रविवारी सायंकाळी दाटून आलेल्या ढगांनी थोडीफार बरसात केली. प्रतापूर शिवारात मानमोडे बाबा मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला बाभळीचे झाड मोटारसायकलवर कोसळले. निमगावजाळी परिसरात विजेचे खांब कोसळले. विजेच्या ताराही तुटल्याने जमिनीवर पडल्या. लोणी-संगमनेर रोडवरील झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

निमगावजाळी परिसरात विजेच्या तारा जमिनीवर पडल्या. तसेच वादळाने झाडे उन्मळून पडली. नागरीकांनी महसूल व विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी नॉट रिचेबल होते. नुकसानीची माहिती देता न आल्याने मदती अभावी अनेकांचे हाल झाले. तसेच रात्री 5 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. पावसामुळे व वादळामुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तसेच पॉली हाऊसचे पण नुकसान झाले आहे या सर्व नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी निमगावजाळी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com