निमगाव खैरी सोसायटी निवडणुकीच्या 13 जागांसाठी 83 उमेदवारी अर्ज दाखल

निमगाव खैरी सोसायटी निवडणुकीच्या
13 जागांसाठी 83 उमेदवारी अर्ज दाखल

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या निमगांव खैरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या सन 2022-2027 साठी होणार्‍या निवडणुकीत 13 जागांसाठी 83 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सध्या उमेदवारी दाखल केल्याप्रमाणे सहा गट प्रमुखांनी आपापले पाच पॅनल पूर्ण केल्याचे दिसत असले तरी 10 मार्चच्या माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ 8, इतर मागासवर्गीय मतदार संघ 1, अनु. जाती-जमाती मतदारसंघ 1, भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघ 1, महिला राखीव मतदार संघ 2 अशा एकूण 13 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदानास पात्र मतदारांची संख्या 1290 इतकी आहे. प्रत्येक गट प्रमुखाला ही लढत एकास एक व्हावी, अशी इच्छा असली तरी जागा वाटपामुळे लढत तिरंगी होऊ शकते.

मार्केट कमीटीचे संचालक नितीन भागडे आणि राजेंद्र बनकर, अशोकचे संचालक आदीनाथ झुराळे, निमगाव खैरी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य शिवाजी शेजुळ, काँग्रेसच्या कानडे गटाचे विलास शेजुळ, काँग्रेसच्या ससाणे गटाचे सुरेश कालंगडे या सर्वांनी उमेदवार उभे केले असून जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार, वरिष्ठ काय आदेश करणार, कोण कोणाला बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार ? हे पहाणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एस. पी. रुद्राक्ष हे कामकाज पाहत असून त्यांना संस्थेचे सचिव सचिन कदम हे सहकार्य करतील. 10 मार्चपर्यंतच्या माघारीनंतर 11 मार्चला चिन्ह वाटप आणि 20 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पाडून त्याच दिवशी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com