निंबळक रस्त्यावरून प्रवास करणारे धुळीने त्रस्त

वर्षभरापूर्वी सुरू झालेले काम संथ गतीने सुरू
निंबळक रस्त्यावरून प्रवास करणारे धुळीने त्रस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर ते निंबळक बायपास पर्यंतच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. येणार्‍या- जाणार्‍यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्यावर्षी सुरू झालेले हे काम आजूनही संथ गतीने सुरू आहे, यामुळे या रस्त्याने प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या कामाचा वेग पाहता रस्ता होण्यास अजून किती दिवस लागतील हे सांगता येणार नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

नागापूरच्या कमानीपासून ते निंबळक बायपास पर्यंतच्या रस्ता रूंदी करणासाठी एमआयडीसी अंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. निंबळक बायपासकडे जाणार्‍या- येणार्‍या वाहतूकीसह एमआडीसीतील वाहतूकीसाठी या रस्त्याचा मोठ्याप्रमाणात वापर होतो. या रस्त्यावरून वाहतूक वाढल्याने जुना रस्ता वाहतूकीसाठी अपुरा पडत होता. नव्याने अतिक्रमण काढून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.

पूर्वीचा रस्ताचे खोदकाम करून नव्याने भराव टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. वर्षभरापूर्वी जुना रस्ता खोदून त्यावर भर टाकण्यास सुरूवात झाली. आजूनही भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने मोठ्याप्रमाणात धुळ उडते. दररोज एमआयडीसीत येणार्‍या कामगारांसह या रस्त्याने प्रवास करणार्‍यांना धूळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्ता प्रवास करण्यायोग्य राहिलेला नाही. दुचाकीसह चारचाकी वाहन चालविताना चालकाला कसरत करावी लागते.

रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने साईट पट्टी खोदलेली असल्याने व रस्त्यावर मध्ये खडीचा भराव टाकल्याने वाहन चालकाला वाहन चालवताना कसरत करावी लागते. रस्ता खोदल्यामुळे दगड उघडे पडली आहेत. वाहनांचे स्पार्ट खिळखिळे झाले आहेत. वाहने पंचर होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. संथ गतीने सुरू असलेले काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एमआयडीसीत काम करणार्‍या कामगारांसह या रस्त्याने प्रवास करणार्‍यांची संख्या जास्त आहे. दररोजच या रस्त्याने प्रवास करणारे वर्षापासून वैतागले आहे. धुळीच्या त्रासामुळे व वाहन चालवताना करावी लागणारी कसरत यामुळे रस्ता कधी होतो याची वाट नागरिक पाहत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना छोट्या- मोठ्या अपघाताच्या घटना या रस्त्याने घडत आहे. संथ गतीने सुरू असलेले काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com