दंड झालेला असतानाही निमजच्या मुरूम तस्कराची चोरी सुरुच

File Photo
File Photo

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील निमज गावातून बेकायदेशीर मुरूम तस्करी करणार्‍या एका मुरूम तस्करास कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावण्यात येऊनही या मुरूम तस्कराने तालुक्यातील दुसर्‍या गावात मुरुमाची चोरी सुरू ठेवली आहे. दंडाची रक्कम न भरताही तो मुरुमाची वाहतूक करत असतानाही महसूल अधिकार्‍यांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची खुलेआम चोरी सुरू आहे. प्रवरा व मुळा नदी पात्रातून वाळूचा खुलेआम उपसा सुरू होता. याशिवाय वेगवेगळ्या गावांमध्ये बेकायदेशीर स्टोन क्रेशरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार सुरू होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदभार स्वीकारताच गौण खनिज चोरी बाबत कठोर भूमिका घेतलेली आहे. तहसीलदारांनी बेकायदेशीर गौण खनिज उपसा करणार्‍यांना तब्बल साडेसातशे कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

संगमनेर तालुक्यात मुरुमाची ही मोठ्या प्रमाणावर चोरी सुरूच आहे. तालुक्यातील निमज गावातून एक जण बेकायदेशीर मुरुमाचा उपसा करत होता. त्याच्याबाबत तक्रारी केल्याने तहसीलदारांनी त्याला कोट्यवधी रुपयांचा दंड ठरवलेला आहे. अनेक महिने उलटूनही या मुरूम तस्कराने अद्याप या दंडाची रक्कम भरलेली नाही, असे असतानाही त्याने आपला व्यवसाय सुरू ठेवलेला आहे. निमज ऐवजी अन्य गावांतून तो मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा करत आहे. महसूल प्रशासनातील अधिकार्‍यांना याबाबत कल्पना असतानाही त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई केली जात नाही.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर भूमिका घेऊनही हा मुरूम तस्कर मुरुमाची चोरी करत असल्याने महसूल अधिकार्‍यांनी महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याची चर्चा आहे. या मुरूम तस्कराकडून दंड का आकारला जात नाही ?असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

जप्त केलेल्या गाड्या चलन न भरताच गायब

काही महिन्यांपूर्वी तहसीलदारांनी या मुरूम तस्कराच्या तीन गाड्या जप्त केल्या होत्या. बेकायदेशीर मुरूम वाहतूक करताना आढळल्याने तहसीलदारांनी ही कारवाई केली होती. जप्त केलेल्या तीनही गाड्या संगमनेरच्या पोलीस वसाहतीमध्ये लावण्यात आल्या होत्या. या मुरूम तस्कराने या गाड्या परस्पर गायब केल्या. तीन पैकी एकाच वाहनाचे चलन त्याने भरले मात्र एकच चलनावर तीनही गाड्या तो घेऊन गेला होता. तहसीलदारांनी याप्रकरणी अद्याप त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याने महसूल विभागाचे हात मलिद्याने बरबटलेले आहेत का? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com