
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
निळवंडे धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली होती. पाटबंधारे, वन व महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या हजेरीत अडचणी सोडविण्याचा प्रयत्न झाला. प्रश्न सुटल्यानंतर कामकाज योग्यपणे सुरळीत होते की नाही? हे पाहण्यासाठी निळवंडे कालव्याच्या कामकाजाला राज्यमंत्री तनपुरे यांनी ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. निळवंडेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
अनेक वर्षांपासून निळवंडे धरणाच्या कालव्याचे पाणी लाभावे यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य शासनाकडून निळवंडे धरणाच्या कालव्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. निळवंडेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचत असतानाच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. कालव्याचे काम वन विभागाच्या हद्दीत होत असल्याने शासकीय मंजुरी व विविध प्रशासकीय अधिकार्यांच्या संमतीची गरज होती. त्याबाबत काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री तनपुरे यांनी कानडगाव येथे वन, महसूल व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली.
त्यावेळी तिन्ही विभागातील शासकीय अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर कामातील अडथळे व तांत्रिक समस्या सोडविण्यात आल्या. राज्य शासनाने सुमारे 900 कोटीचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्यानंतर निळवंडेच्या कामाला गती मिळाली आहे. निळवंडेचे काम सुरळीतपणे सुरू असतानाच अचानकपणे राज्यमंत्री तनपुरे यांनी आपल्या दौर्यावेळी भेट दिली.
निळवंडेच्या कामकाजाबाबत पाटबंधारे विभागाचे मंत्री जयंत पाटील व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नांनी निळवंडे धरणाचे उर्वरित कामे पूर्ण होत असल्याचे समाधान राज्यमंत्री तनपुरे यांनी व्यक्त केले. 52 पैकी 50 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. बोगद्याचे काम पूर्ण होत असल्याचे समाधान राज्यमंत्री तनपुरे यांनी व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी कानडगाव येथे शासनाच्या वन, महसूल व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर तांत्रिक समस्या सोडविल्या होत्या. त्या समस्या संपुष्टात येऊन काम योग्यपणे सुरू आहे की नाही? हा विचार मनात घेऊन चालू दौर्यातून निळवंडेचे काम पाहण्यास गेलो. सर्व काम सुरळीत असल्याचे पाहून घेतलेली बैठक सार्थ ठरल्याचे समाधान लाभल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.