
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
निळवंडेच्या पाण्याने जिरायती भागातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावे व उजव्या कालव्याचे काम तात्काळ पूर्ण करावे यासह विविध मागण्यांसाठी जलसंपदा कार्यालय घुलेवाडी याठिकाणी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी सोडण्याचा ठोस निर्णय देणार नाही तोपर्यंत आंदोलन स्थळावरून उठणार नाही, अशी भूमिका यावेळी शेतकर्यांनी घेतली. तीन तास चाललेले हे आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. 30 सप्टेंबरच्या आत पाणी सोडण्याचे, तर उजव्या कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन जल संपदा विभागाकडून देण्यात आले आहे.
निळवंडेच्या लाभक्षेत्रात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके पावसाअभावी पूर्ण जळून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी 30 मे ला झाली. कालवा खोदाईवेळी डोंगराला पडलेल्या भेगांमुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. ही गळतीवर उपाययोजना पूर्ण करून पुढील एक ते दोन महिन्यांत दुसरी चाचणी घेणे अपेक्षित होते. मात्र हे काम काळ्या माती अभावी फारच धिम्यागतीने सुरू होते. याविरोधात शेतकर्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अक्रोश निर्माण झाला होता. निळवंडेच्या कालव्याद्वारे जिरायती भागातील पाझर तलाव जर भरून दिले तर मोठ्या प्रमाणात दुष्काळाची दाहकता कमी होईल व पशुधन जगेल अशी भावना यावेळी शेतकर्यांनी व्यक्त केली.
वडगावपान फाट्यावरून मोर्चाला सुरुवात करून शेतकरी जलसंपदा कार्यालयावर मोठ्या संख्येने येऊन धडकले. पाणी सोडण्याची वेळ देत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमीका यावेळी शेतकर्यांनी घेतली. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी येत्या 30 सप्टेंबरच्या आत कालव्यांना पाणी सोडू, असे लेखी आश्वासन दिले. तर ओढ्यांवर जरी एस्कॅप नसले तरी पाझर तलाव भरण्यास कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही असे कार्यकरी अभियंता कैलास ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आंदोलक शेतकरी शांत झाले व आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कालवा अस्तरीकरण एकाच ठेकेदाराला न देता जलद कामासाठी विभागून द्यावे, निळवंडे पाणी जायकवाडीला सोडू नये, चार्यांची कामे तात्काळ पूर्ण करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनावेळी निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, विठ्ठल घोरपडे, राजू सोनवणे, उत्तमराव घोरपडे, दत्ता भालेराव, सुकदेव अण्णा खालकर, सत्यकी थोरात, दिनकर लोंढे, प्रल्हाद गागरे, तात्याभाऊ दिघे, संदिप महाराज गवांदे, प्रभाताई घोगरे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुखलाल गांगवे यांनी केले.
आमदार थोरात यांची मागणी
निळवंडे हे धरण व कालवे अनेक अडचणीवर मात करून आपण दुष्काळी गावांकरता पूर्ण केले आहे. जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून दुष्काळी 182 गावांना दिलासा देण्याकरता शासनाने तातडीने डाव्या कालव्यातून पाणी सोडावे व उजव्या कालव्याचे काम त्वरित पूर्ण करून त्या कालव्याला ही लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी मागणी आमदार थोरात यांनी सरकारकडे केली आहे.
आज आम्ही संयम ठेऊन आंदोलन केले आता संयमाचा अंत झाला आहे. या भीषण दुष्काळात जगायचे असेल तर निळवंडेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला हक्काचे पाणी मिळणार नसेल तर आमच्या पशुधनासह जलसंपदा कार्यालयात येऊन राहू.
- नानासाहेब शेळके, अध्यक्ष, निळवंडे पाटपाणी कृती समिती
नैसर्गिक दुष्काळ आम्हाला मान्य आहे. मात्र आमच्यावर लादलेला मानवनिर्मित दुष्काळ आम्हाला मान्य नाही. आमच्या हक्काचे निळवंडेचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे.
- सुखलाल गांगवे, लाभधारक शेतकरी