निळवंडे कालव्यासांठी पाचशे कोटींची तरतूद

कालवा समितीने केले स्वागत
निळवंडे कालव्यासांठी पाचशे कोटींची तरतूद

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांसाठी वरदान ठरण्यार्‍या निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी अर्थ संकल्पात 400 कोटी तर

पुरवणी अर्थसंकल्पात 100 अशी पाचशे 500 कोटींची तरतूद झाल्याशी माहिती उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली असल्याने निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त करुन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील व अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अप्पर प्रवरा-2 (निळवंडे प्रकल्प) या प्रकल्पाला प्रथम मंजुरी दि.14 जुलै 1970 रोजी मिळाली.आजता गायत या प्रकल्पाला पन्नास वर्ष उलटली आहे.मात्र तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.कालव्यांची कामे आधी होणे अभीप्रेत असताना येथे धरणाची भिंत आधी व कालवे पन्नास वर्षातही होऊ शकले नाही.त्यामुळे या प्रस्तावित लाभक्षेत्राखालील 190 दुष्काळी गावातील जवळपास 68 हजार 800 हेक्टर क्षेत्र शेती सिंचना पासून वंचित राहिले आहे.

त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे.शिवाय या भागात शेतकर्‍यांच्या मुलांना कोणी विवाहासाठी मुली देत नसल्याने मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला होता.या गावातील शेतकर्‍यांना शेती असूनही त्यांना खडी फोडण्यासाठी दुर्दैवाने जावे लागत होते.या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम जवळपास पन्नास टक्के बाकी आहे.

त्यासाठी 1100 कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता आहे.याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने शासन दरबारी आंदोलने करत असून उच्च न्यायालय औरंगाबाद यांचेकडे जनहित याचिकेद्वारे पाठपुरावा करून शासनास जेरीस आणले आहे.आता हा प्रकल्प दृष्टी पथात आला आहे.कालव्यांची कामे वेगाने सूरु असून पुढील वर्षी जूनमध्ये पाणी येण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान आज जाहीर होणार्‍या अर्थ संकल्पात नेमकी किती तरतूद होणार याकडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून होते.याबाबत आमच्या प्रतिनिधीने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,निळवंडे प्रकल्पासाठी मुख्य अर्थसंकल्पात 400 कोटी तर पुरवणी अर्थसंकल्पात 100 कोटी अशी 500 कोटींची तरतूद झाल्याची माहिती दिली आहे.त्याला निळवंडे प्रकल्पाचे नुकतेच बढतीवर बदलून गेलेले अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी दुजोरा दिला आहे.

निळवंडे कालवा कृती समितीने यापूर्वीच सरकारकडे दि.11 जून रोजी पत्रव्यवहार करून 1100 कोटी रुपयांची मागणी केली होती.त्याबाबत जलसंपदा विभागाने दि.22 फेब्रुवारी 2021 रोजी जा.क्रं.उ.प्र.वि./प्र.शा.-2/493 /सन-2021 अन्वये पत्रव्यवहार करून जलसंपदा विभागाकडे निधीची मागणी केली होती.दरम्यान याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जनहित याचिका अद्याप प्रलंबित असल्याची माहिती कालवा कृती समितीचे अड्.अजित काळे यांनी दिली आहे.

दरम्यान या प्रकल्पाच्या भिंतीचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे.या प्रकळपाच्या मुख्य कालव्यांची कामे 51.65 टक्के तर जानेवारी 2021 अखेर 01 हजार 539 कोटी 42 लाख रुपये खर्च झाला आहे.गत आर्थिक वर्षात 169 कोटी 59 लाखांचा खर्च झालेला आहे.तर गत वर्षी अर्थसंकल्पात 105 तर नाबार्ड अंतर्गत 70 कोटी अशी 175 कोटींची तरतूद झालेली होती.प्रकल्पास दि.21 जून 2017 रोजी 2369.95 कोटींची चतुर्थ सुप्रमा प्राप्त आहे.

या मोठ्या आर्थिक तरतुदीबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक पत्रकार नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, कार्याध्यक्ष-मच्छिंद्र दिघे, उपाध्यक्ष एस. यु. उर्‍हे, संजय गुंजाळ, सचिव कैलास गव्हाणे, संघटक संदेश देशमुख, वामनराव शिंदे, माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे, रमेश दिघे, उत्तमराव जोंधळे, अशोक गांडुळे, विठ्ठलराव देशमुख, सचिन मोमले, महेश लहारे, नामदेव दिघे, पाटीलबा दिघे, कौसर सय्यद, आप्पासाहेब कोल्हे, रावसाहेब मासाळ, नवनाथ शिरोळे, सोमनाथ दरंदले, विठ्ठलराव पोकळे, दत्तात्रय आहेर, बाळासाहेब सोनवणे, आबासाहेब सोनवणे, तानाजी शिंदे, ज्ञानदेव शिंदे, रामनाथ ढमाले, जनार्दन लांडगे, सोपान थोरात, गोरक्षनाथ शिंदे, भाऊसाहेब गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, माधव गव्हाणे, दिलीप खालकर, भाऊसाहेब देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com